WTC Points Table After IND vs BAN 1st test match result : टीम इंडियाने बांगलादेशसोबत खेळला गेलेला पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला असून यासह 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने बांगलादेश संघाला 515 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र बांगलादेशचा संघ 234 धावांवरच मर्यादित राहिला आणि भारताने धमाकेदार विजय मिळवला. या विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि कंपनीला फायदा झाला आहे, तर दुसरीकडे बांगलादेश संघाचे मोठे नुकसान झाले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 आवृत्तीत टीम इंडिया सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ आधीच नंबर-1 वर होता आणि आता चेन्नई कसोटी जिंकून त्याने आपले नंबर-1 चे स्थान आणखी मजबूत केले आहे. भारताने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आहेत, 2 गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यासह भारत 71.67 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियन संघ 62.50 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
बांगलादेश संघाचे मोठे नुकसान…
चेन्नई कसोटीत भारताकडून झालेल्या पराभवामुळे बांगलादेश संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. बांगलादेशला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. बांगलादेशची चौथ्यावरुन सहाव्या स्थानी घसरली आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 45.83 वरुन 39.29 अशी झाली आहे. बांगलादेशने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. बांगलादेशच्या घसरणीमुळे श्रीलंका आणि इंग्लंडला 1-1 स्थानाने फायदा झाला आहे. श्रीलंका 42.86 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या तर इंग्लंडचा संघ 42.19 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ शकते फायनल…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाऊ शकतो. वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मागील आवृत्तीत देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC अंतिम सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कांगारू संघाने विजेतेपद पटकावले होते आणि भारताला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा कानपूरमध्ये 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर त्यांनतर रोहितसेना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे.