मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार हे नवीन नाहीत. अशास्थितीत आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित रहावी आणि व्यवहारही पारदर्शक राहावा यासाठी काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करताना कायदेशीर प्रक्रिया पालन करण्याबाबत आग्रही असणे गरजेचे आहे. अर्थात बहुतांश मंडळींच्या समजानुसार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याने कधीही तोटा होत नाही. तरीही अशा क्षेत्रात गुंतवणूक करताना काही खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. भारतात रिअल इस्टेट क्षेत्राला सुरक्षित गुंतवणूक मानली गेली आहे, मात्र त्यात काही चुकांपासून वाचले पाहिजे. सर्वसाधारणपणे रिअल इस्टेटच्या व्यवहारात होणाऱ्या चुकांची माहिती इथे सांगता येईल. यानुसार त्यापासून आपण सजग राहणे महत्त्वाचे आहे.
पहिली चूक : खूप गुंतवणूक करणे
जर आपण दुसरे घर गुंतवणुकीच्या उद्देशातून खरेदी करत असाल तर आपल्या एकूण गुंतवणुकीत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. दुसरे घर खरेदी केल्यानंतर आपल्याला अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही. यातून आपली गुंतवणुकीची व्याप्त वाढणार नाही आणि जोखीम वाढू शकते. जर रिअल इस्टेट बाजाराची स्थिती खराब असेल तर आपल्याला एकूण गुंतवणुकीतून मोठे नुकसान सहन करावे लागेल.
काय करावे
दुसरे घर खरेदी करण्यापूर्वी गुंतववणुकीत वैविध्यपणा आणण्याचा प्रयत्न करावा. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने, मुदत ठेवी यासारख्या अन्य पर्यायांचा देखील विचार करायला हवा.
दुसरी चूक: कमी कालावधीसाठी गुंतवणूक
काहींच्या मते रिअल इस्टेटमध्ये कमी कालावधीत भरपूर पैसा कमावता येतो. मात्र असे व्यवहार करताना कर आकारणीकडे साफ दुर्लक्ष होते.
मालमत्तेच्या बाबतीत शॉर्ट टर्म गेन्सवर कर अधिक आकारला जातो. मालमत्ता खरेदीनंतर तीन वर्षाच्या आत विक्री केल्यास त्यावर कर आकारला जातो. घर विक्रीतून होणाऱ्या फायद्याला कलम 54 इ सी बॉंडमध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकतो. रिअल इस्टेटपासून शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सप्रकरणात कोणतिही सवलत दिली जात नाही. याप्रमाणे सर्व लाभ आपल्या उत्पन्नाला जोडले जातात. आपल्या टॅक्सस्लॅबच्या हिशोबानुसार त्यावर कर आकारला जातो.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका (भाग-२)
काय करावे
रिअल इस्टेटमध्ये कमी कालावधीच्या व्यवहाराअगोदर कररचना जाणून घ्यावी.
– सत्यजित दुर्वेकर