हरियाणा – सध्या दिवसेंदिवस देशासह अनेक राज्यांत पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, काही राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या देशात करोनाग्रस्त लसी, रेमडेसिविर व ऑक्सिजनसारख्या करोनाविरुद्धच्या शस्त्रांचा तुडवडा असून अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.
अश्यातच करोना लस चोरण्यासारख्या घटना घडल्यावर खेद व आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरियाणा मधील जिंदमध्ये अशीच एक विचित्र घटना घडली आहे. एका अज्ञात चोराने हॉस्पिटलमधील करोना व्हॅक्सिनच्या तब्बल १७०० लसी चोरल्याची घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे या चोराला पश्तात्ताप होताच त्यानं या सर्व लसी परत केल्या आहेत.
“माफ करा.. .करोनाशी संबंधित लसी यामध्ये होत्या याची मला कल्पना नव्हती” असं त्या चोरानं चिठ्ठीमध्ये म्हटलंय. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसींनी भरलेली पिशवी या चिठ्ठीसोबत चोरानं परत हॉस्पिटलमध्ये सोडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या चोराचा शोध घेत आहेत.
काल, गुरुवारी दुपारच्या सुमारास जिंद मधील सिविल लाइन हॉस्पिटलच्या बाहेरच्या चहाच्या टपरीवर एका माणसाकडे ही पिशवी दिली. यामध्ये पोलिसांसाठी खाद्यपदार्थ असून मला अत्यंत तातडीच्या कामासाठी जायचं असल्याची विनंती त्या व्यक्तिनं संबंधित माणसाकडे केली. त्यानंतर हा सगळा उलगडा झाला.