सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनुसूचित जमाती या संवर्गातील गट क आणि गट ड मधील 69 जागांसाठी पात्र ठरलेल्या 9 हजार 841 उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवार, दि. 22 रोजी साताऱ्यातील 12 केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनोज जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्यावतीने अनुसूचित जमातीच्या 69 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, परिचर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले होते. छानणीत मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्याने आता 9 हजार 841 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कंत्राटी ग्रामसेवक यांची लेखी परीक्षा सकाळी 11 ते 12.30 या वेळेत अनंत इंग्लिश स्कूल, कन्या शाळा सातारा, महाराजा सजायीराव विद्यालय सातारा, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा याठिकाणी 88 खोल्यांमध्ये 3 हजार 23 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परिचर पदासाठी साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, कन्या शाळा सातारा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, धनंजयराव गाडगीळ कॉलेज,सातारा, लाल बहाद्दूर शास्त्री कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, भवानी विद्यालय, सातारा, श्रीपतराव पाटील विद्यालय, सातारा या केंद्रांवरील 285 खोल्यांमध्ये 6 हजार 818 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
पोस्टाद्वारे पाठवलेले प्रवेशपत्र न मिळाल्यास हे करा….
जिल्हा परिषदेच्या अनुसुचित जमाती संवर्गातील भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना पोस्टाने पाठवलेली प्रवेशपत्र मिळाली नसतील त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र प्रिंट करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया याठिकाणी लेखी परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मध्ये http.//pageeloder.cloud/frmtr.aspx लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उमेदवारांनी या संकेतस्थळावर लेखी परीक्षा प्रवेशपत्र मध्ये दिलेल्या लिंकवर संबंधित पदाचे नाव पर्याय निवडून त्याठिकाणी मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक (संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या यादीत नमूद केलेला अर्ज क्रमांक) अशी माहिती भरुन लेखी परीक्षा प्रवेशपत्र प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.