लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसिन यांचे निधन

मुंबई : प्रख्यात स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसिन यांचे आज पहाटे निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. मानवतावादी कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. कमला भसिन यांच्या निधनाने स्त्रीवादी चळवळीचा आवाज हरपला असून चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

दक्षिण आशियातील स्त्रीवादी चळवळीला आकार आणि दिशा देण्याचे काम कमला भसिन यांनी केले. आपल्या कामाच्या आणि लेखनाच्या माध्यमातून कमला भासिन यांनी लैंगिक भेदभाव, स्त्री शिक्षण, मानवाधिकार यासारख्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला. नाटक, गीत आणि कलेच्या माध्यमातूनही त्यांनी समाज जागरुकतेचे काम केले. कमला भसिन यांनी पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर सातत्याने टीका केली आणि त्यावर विपूल लेखन केले.

अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनीही कमला भसिन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भविष्यातील स्त्रीवादी चळवळीला कमला भसिन यांची उणीव नक्कीच जाणवणार असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

कमला भसिन यांनी 1970 च्या दशकात स्त्रीवादी चळवळीसाठी काम सुरु केले . 2002 साली त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क असलेले ‘संगत’ ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्यासाठी काम केले. कमला भसिन यांनी लिहिलेल्या अनेक स्त्रीवादी पुस्तकांचे 30 हून जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.