Wrestling | जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांचा बोलबाला

सात पदकांची कमाई

रोम – जागतिक मानांकन मालिका कुस्ती स्पर्धेत भारतीय संघ दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदके घेऊन मायदेशी परतणार आहे. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या दोन्ही अव्वल मल्लांनी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा निश्‍चित पूर्ण केल्या आहेत. त्याचवेळी काही नवोदित कुस्तीगिरांनी अपेक्षा उंचावल्या आहेत.

विनेश आणि बजरंग या दोन्ही मल्लांनी कमाल केली. दोघांनी परस्परविरोधी पद्धतीने सुवर्णपदकाची कमाई करत अव्वल स्थान भूषवले. विनेशने 53 किलो वजनी गटात कॅनडाच्या डिआना मेरी हेलेन वेईकर हिला साफ निष्प्रभ केले. दुसरीकडे पुरुष गटात 65 किलो वजन गटात बजरंगाला आपली कमाल दाखवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. मंगोलियाच्या ऑलिंपिक पात्र तुमूर ओचिरने त्याच्या बचाव आणि संयमाची कसोटी पाहिली. अर्थात, बजरंग त्याला पुरून उरला.

पुरुष गटात फ्री-स्टाईल प्रकारात विशाल कालिरामण (70 किलो) तिसऱ्या स्थानावर आला आहे. रोहित (65 किलो), राहुल राठी (79 किलो), परवीन (93 किलो) आणि सुमित मलिक (125 किलो) हे अन्य भारतीय मल्ल पहिल्या पाचात आले आहेत. ऑलिंपिक पात्र दीपक पूनिया (86 किलो) आणि रवी दहिया (57 किलो) हे दोन मल्ल या स्पर्धेत सहभागी नव्हते. त्यामुळे आता ते बिगरमानांकित असतील.

नंदिनी साळोखे चौथी

या स्पर्धेत ऑलिंपिक ब्रॉंझ विजेत्या साक्षी मलिकने (62 किलो) निराशा केली. त्याचवेळी 53 किलो वजनी गटात विनेशला बॅकअप म्हणून नावारूपाला येणारी कोल्हापूरची नंदिनी साळोखेने अपेक्षा उंचावल्या आहेत. या वर्षी तिला अपयश आले असले, तरी पदार्पणात ती आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसमोर कमालीच्या आत्मविश्‍वासाने उभी राहिली. ती आता चौथ्या स्थनावर आली आहे. त्याचवेळी सरिता मोर आणि अंशु मलिक या 57 किलो वजन गटातील खेळाडूदेखील पहिल्या पाचमध्ये आल्या आहेत. कुस्ती प्रकारातील 53 किलो वजन गटाप्रमाणे 57 किलो वजन गटातही भारताच्या सरिता रौप्यपदकाने दुसऱ्या, तर अंशु चौथ्या स्थानावर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.