नवी दिल्ली :– गेल्या 28 मे रोजी आमच्या मुलींसोबत जे झाले ते पाहून अत्यंत वाईट वाटले. आम्ही अगोदर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना हटवणार आणि त्यानंतर 2024 मध्ये त्यांचे समर्थन करणाऱ्यांनाही हटवणार असा दावा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आम्ही पैलवानांसोबत उभे आहोत. त्यांना (पैलवानांना) माझे निवेदन आहे की त्यांनी राजस्थानातही यावे. येथे लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. मी लवकरच राजस्थानात जाणार आहे. ब्रिजभूषणला पाठिंबा देणाऱ्यांना पराभूत करण्यासाठीच मी जाणार आहे. प्रत्येक गावांत त्यांची वाईट अवस्था करणार आहे. मुलींच्या अपमानाचा बदला आम्ही निवडणुकीत घेउ. पैलवानांना पाठिंबा देत राहीलो तर सरकार त्यांची माफी मागेल आणि त्यांच्या मागण्याही मान्य करेल.
दरम्यान, सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की 40 जवानांच्या मृतदेहांवर उभे राहुन भारतीय जनता पार्टीने निवडणूक जिंकली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मला या विषयावर गप्प राहण्यास सांगितले होते. या विषयाची दिशा पाकिस्तानकडे करण्यात आली आणि त्याची चौकशी झाली नाही.
गृहमंत्रालयानेच जवानांसाठी विमान दिले नाही. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू होते त्यावेळीही मी माझा राजीनामा खिशात ठेवून पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो. मात्र त्यावेळी सरकारने माझे ऐकले नाही. एमएसपीशिवाय शेतकरी जगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना एमएसपीची हमी देणारा कायदा लागू केला जात नाही तोपर्यंत लढण्याची तयारी ठेवावी लागेल असे आवाहनही सत्यपाल मलिक यांनी केले.