नवी दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार यास सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यास तिहारमधील मंडोली तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यावेळी सुशील कुमारने तुरुंगातील जेवणाने पोट भरत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच या जेवणामधून प्रोटीन मिळत ऩसून आपल्या प्रोटीनवयुक्त जेवण देण्यात यावी अशी मागणी सुशीलने केली आहे. तसेच गरज पडल्यास प्रोटीनयुक्त खुराक मिळवण्यासाठी त्याने न्यायालयात अर्ज करण्याचाही विचार सुरू केला आहे.
सुशीलला जेल क्रमांक 15 मध्ये ठेवण्यात आले आहे. बुधवारी सुशीलने तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे जेवणाबाबत काहीही तक्रार केली नव्हती. गुरुवारी संध्याकाळी मात्र त्याने जेवणाबाबत तक्रार केली. आपल्याला तुरुंगातील जेवण पुरत नसल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्याला अधिक खुराक गरजेचा असून आपण कुस्तीपटू असल्याने तो प्रोटीनयुक्त असायला हवा असं सुशीलन म्हणाला आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुरुंगातील जेवण पुरणार नाही असं त्याचं म्हणणं आहे.
मंडोलीतील हायरिस्क जेलमध्ये सुशीलला ठेवण्यात आले असून या तुरुंगात जवळपास 100 चक्कीसेल आहेत.त्यातल्या एका कोठडीत सुशीलला ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत इतर कोणताही कैदी ठेवण्यात आलेला नाही. प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडाकडून सुशीलच्या जीवाला धोका पोहोचू नये यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सुशीलच्या जीवाला ज्या गुंडापासून धोका आहे ते गुंड किंवा त्यांचे साथीदार हे तिहार तुरुंगातच कैद आहेत.
छत्रसाल स्टेडियममध्ये पाच मे रोजी युवा कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली होती. या हत्येत सुशीलसह त्याचा पीए अजय याची मुख्य भूमिका होती. मॉडल टाउन पोलिस स्टेशन परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये एक फ्लॅट रिकामे करण्यावरून दोन गटात राडा झाला. या घटनेत पाच कुस्तीपटू गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सागरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.