नवी दिल्ली – कुस्तीत टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या भारताच्या तयारीला मोठा फटका बसला आहे. या स्पर्धेत ज्याच्याकडून पदकाची आशा होती तो कुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला आहे. त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची पडताळणी व चौकशी केल्यावरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती भारतीय कुस्ती महासंघाने दिली आहे.
कुस्तीपटू सुमितवर बंदी घालताना पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने त्याला निलंबित केले आहे.
सुमितने 2018 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तो टोकियो ऑलिम्पिकला 122 किलो वजन गटात पात्र झाला होता. सुमितची आणखी एक चाचणी 10 जून रोजी होईल. दरम्यान, त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर सुनावणी केली जाईल, असे भारतीय कुस्ती महासंघाने सांगितले आहे.