Wrestling | रोममध्ये बजरंगाची कमाल

दोन सुवर्णासह पटकावले जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान

रोम – भारताचा ऑलिम्पिक पात्र कुस्तीगीर बजरंग पुनियाने अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेरच्या तीस सेकंदांत दोन गुणांची कमाई करताना मानांकन स्पर्धेतील विजेतेपद तर राखलेच, बरोबरीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही परत मिळविले.

मंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओशिर याने अंतिम लढतीत बजरंगला अनपेक्षित प्रतिकार केला. मानांकन कुस्ती स्पर्धेतील या 65 किलो वजनीगटाच्या अंतिम लढतीत अखेरच्या क्षणापर्यंत बजरंग 0-2 असा मागे होता. दोघांचा बचाव तगडा राहिला. अर्थात, या प्रयत्नात दोनदा खेळात निष्क्रियता दाखवल्यामुळे बजरंगला ताकीद देण्यात आली होती.

या दोन्ही वेळी एका मिनिटात गुण वसूल करण्यात बजरंगला अपयश आले. त्यामुळे दोन्ही वेळा एकेक गुण तुमूरला बहाल करण्यात आला. मात्र, जिगरबाज बजरंगने प्रयत्न सोडले नाहीत. त्याने लढत संपण्यास अवघी 30 सेकंद असताना तुल्गाचा ताबा मिळवित दोन गुणांची कमाई करून लढत बरोबरीत आणली. बरोबरी साधताना अखेरचा गुण बजरंगने कमाविल्यामुळे नियमानुसार बजरंगला विजयी घोषित करण्यात आले.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या 27 वर्षीय बजरंगने आपला बचाव कमी पडल्याचे मान्य केले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे असेल, तर मला बचावाच्या आघाडीवर खूप सुधारणा करावी लगणार असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, करोनाच्या संकटामुळे मिळालेल्या सुट्टीचा खूप तोटा झाला. माझ्या पायाचा बचाव अजून सुधारायला हवा. त्याचबरोबर आक्रमणाच्या चाली देखील सुधारणे
आवश्‍यक आहे.

अंतिम लढतीविषयी बजरंगने प्रतिकार अनपेक्षित होता असे सांगतिले. तो म्हणाला, सध्या 65 किलो वजन गट आव्हानात्मक आहे. तुमूर या पूर्वीच ऑलिम्पिकला पात्र ठरला आहे. पण, त्याच्याकडून इतका कडवा प्रतिकार मला अपेक्षित नव्हता. अर्थात, ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरल्यामुळे त्याचेही चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्ट असेल. एकूणच आम्ही सर्व जण एकाच पातळीवरचे आहोत.’

ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसलेल्या 70 किलो वजनीगटात विशाल कालीरामण याने कझाकस्तानच्या सिर्बाझ तलगट याच्यावर 5-1 असा विजय मिळवून ब्रॉंझपदक मिळविले. त्याचवेळी नरसिंगचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अपयशी ठरले. त्याला कझाकस्तानच्या दानियार कईसानोवकडून 74 किलो वजन गटात ब्रॉंझपदकाची लढत गमवावी लागली.

या स्पर्धेत भारताने सात पदके मिळविली. यात विनेश फोगट आणि बजरंगच्या सुवर्णपदकाचा समावेश होता. सरिता मोर रौप्यपदकाची मानकरी ठरली. ग्रीको-रोमन प्रकारात नीरज (63 किलो), कुलदीप मलिक (72 किलो) आणि नवीन (130 किलो) यांनी ब्रॉंझपदके मिळविली.

राष्ट्रीय शिबिरात परतणार

बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात परतणार आहे. मात्र, आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेपूर्वी आपल्याला परदेशात प्रशिक्षण घ्यायचे आहे. पण, करोनाच्या संकटामुळे यात अडचणी येऊ शकतात. युरोपात नव्याने बंधने आली आहेत. त्यामुळे प्रवासात अनेक अडचणी आहेत. या कालावधीत प्रवास सोपा राहिलेला नाही. तुम्हाला अनेक फॉर्म भरावे लागतात, वेगवेगळी ऍप डाऊनलोड करावी लागतात. त्याचबरोबर माहिती तर सारखी भरून द्यावी लागते. त्यामुळे परदेशात सरावाची नुसती इच्छा असून चालणार नाही. बघूया काय घडते, असे बजरंगने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.