नवी दिल्ली – ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आगामी कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेबाहेर पडला आहे. पुनियाला ऑलिम्पिक स्पर्धेतनंतर लिगामेंट टीअर उपचार करण्यासाठी सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे पार पडणार असून प्रकृती स्थिर होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही.
बजरंगने अलीकडेच एमआरआय केले होते आणि ऑलिम्पिकच्या आधी जूनमध्ये रशियात झालेल्या दुखापतीची तीव्रता जाणून घेण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील स्पोर्टस मेडिसीन सेंटरचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारदिवाला यांचा सल्ला घेतला होता.
बजरंग म्हणाला, लिगामेंटमध्ये इजा झाली असून डॉ. दिनशॉ यांनी मला सहा आठवडे प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत आराम करण्यास सांगितले आहे. यामुळे मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. माझा हंगाम संपला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एकमेव मोठी स्पर्धा शिल्लक आहे. मात्र, मी यावर्षी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही, असे त्याने सांगितले.