कझाकस्तान -भारताच्या युवा कुस्तीपटू अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता गटात शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीसह त्यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले नाव निश्चित केले आहे. दुसरीकडे साक्षी मलिक पात्र न ठरू शकल्याने तिला मोठा धक्का बसला आहे.
हरियाणासाठी शनिवारचा दिवस हा खूपच खास ठरला आहे. सोनीपत येथील सोनम आणि जिंद येथील अंशु या कुस्तीपटूंनी आज दमदार कामगिरी केली आहे. अंशु ही 57 किलो, तर सोनम ही 62 किलो वजनी गटातून खेळतात. अंशु 57 किलोग्रॅम स्पर्धेत वर्चस्व राखत असताना, दुसरीकडे सोनमच्या लवचिकपणामुळे अखेर तिला कोटा सुरक्षित करण्यात मदत झाली.
यामुळे रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकचे दरवाजे बंद झाले. सोनमने नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये साक्षीला चार वेळा पराभूत करून 62 किलो वजनाची गटात आपली दावेदारी निश्चित केली होती. दरम्यान, पुरुष गटातून बजरंग पुनिया (65 किलो), रवी दहिया (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) यांनी स्पर्धेत पात्रता मिळविली आहे.