- सांगवी करसंकलन कार्यालयामध्ये मनसेचे आंदोलन
पिंपळे गुरव – सांगवी करसंकलन कार्यालयामध्ये गेली दीड महिन्यापासून प्रशासन अधिकारी जागेवर भेटत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (दि. 20) संबंधित कार्यालयाला भेट देऊन अधिकारी नसल्याने खुर्चीला पुष्पहार वाहून त्या खुर्चीचा सत्कार करण्यात आला.
मागील दीड महिने अनेक नागरिकांच्या मनसेकडे तक्रारी येत आहेत. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख येथील नागरिक या ढिसाळ कारभाराला त्रस्त झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तिथे वारंवार भेट देऊनसुद्धा हेच चित्र पहावयास मिळत होते.
अखेर आज संबंधित अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीचा प्रतिकात्मक रूपाने सत्कार करण्यात आला आहे. यापुढे जर कायमस्वरूपी प्रशासन अधिकारी मिळाला नाही तर मनसेच्या वतीने अधिकारी मिळेपर्यंत पिंपरी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळेस उपाध्यक्ष राजू सावळे तसेच अलेक्सझांडर मोझेस, सुरेश सकट, विशाल पाटील, महेश केदारी, मंगेश भालेकर, अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड, रुस्तम इराणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.