वाल्हे (वार्ताहर) –पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगोरी गावात सोमवारी (दि. 27) कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. तर शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिलमध्ये तसेच इतर युद्धात प्राणार्पण करणाऱ्या जवानांना अभिवादन करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावातील शहीद शंकर राजाराम शिंदे यांनी कारगिल लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली होती. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे संदीप कारंडे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, उपसरपंच वसंत शिंदे, पल्लवी भोसले, धनंजय शिंदे, प्रकाश शिंदे, माजी सैनिक महादेव गायकवाड, भरत शिंदे, भगवान शिंदे, शरद ताकवले उपस्थित होते.
सैनिक नवनाथ शिंदे म्हणाले की, देशाच्या कामी येण्याचे भाग्य आमच्या गावातील सैनिकांना लाभले. देशाचे संरक्षण करत असताना शत्रूला ताठ मानेने सामोरे जात कारगिल युद्धात आपल्या सैनिकांनी त्यांना आस्मान दाखवले. या युद्धामध्ये आपल्या गावातील शहीद शंकर शिंदे सारख्या जवानांना अतुलनीय पराक्रम करण्याचा संधी मिळाली. अशा प्रकारचे संधी साधण्यासाठी आपल्या गावातील तरुण सदैव तत्पर असतात. म्हणूनच गावातील अनेक तरुण आजही सैन्यामध्ये भरती होताना दिसत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.