वा रे पठ्ठया! लॉकडाऊन मध्ये केली शाळेच्या मैदानात शेती

पुणे -जगभर थैमान घालणाऱ्या करोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, अनेक संस्था, व्यावसायिक अस्थापनांना टाळे लागले. मात्र, या संकटातही न डगमगता बंद असलेल्या शाळेच्या मैदानात चक्क शेती करून माळशिरस तालुक्‍यातील एका युवकाने अनेखा आदर्श घालून दिला आहे. करोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षकांचे पगार द्यायचे कसे असा प्रश्‍न पडलेल्या या युवकाने स्वत: शेती करून या शेतीतून उत्पन्न घेत शिक्षकांच्या कुटूंबांनाही हातभार लावला आहे. शिवशंकर सिताराम पांढरे असे या युवकाचे नाव असून शिवशंकरच्या या धाडसी प्रयत्नाचे स्वस्तरातून कौतूक होत आहेच; मात्र, संकट आल्यावरही खचून न जाता जिद्दीने त्याचा समाना करण्याचे आदर्शही या निमित्तने अनेकांना मिळाला आहे.

इंग्रजी विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या शिवशंकरने शिक्षकाचा पेशा न स्विकारता घरच्या शेतीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नातेपूते जवळ फोंडशिरस या गावी शिवशंकर यांनी 3 एकर जागेत महाकिड्‌स सीबीएससी स्कूल ही शाळा 2013 मध्ये सुरू केली,सध्या ही शाळा सहावी पर्यंत सुरू असून शाळेचे व्यवस्थापन स्वत: शिवशंकर पाहतो. शाळेत सुमारे 13 ते 14 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आहे. देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर शाळेलाही टाळे लागले.

लॉकडाऊन शिथील होताना, शाळा सप्टेंबर मध्ये सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त होत होती. त्यामुळे जवळ असलेल्या पैशातून त्यांनी शिक्षकांचे जमेल तसेच वेतन दिले. मात्र, शाळा सुरू न होण्याची चिन्हे नसल्याने शिवशंकर यांनी मोठा निर्णय घेतला. या धडपडया युवकाने चक्क शाळेच्या एक एकर मैदानात भर पावसाळयात शेती सुरू केली. त्या, ठिकाणी त्याने वांगी, मिरची, झेंडूची फुले तसेच इतर भाजीपाला पिकविण्यास सुरूवात केली.

बघता बघता मुलांच्या मैदानात ही फुलांची शेती बहरण्यास सुरूवात झाली असून शिवशंकर यांना गेल्या महिन्यात जवळपास 75 हजार ते 1 लाखांचे उत्पन्न शेतीतून मिळाले आहे. त्यामुळे, या पैशातून त्यांना शिक्षकांचे वेतन देण्यासही मोठी मदत झाली आहे. त्यामुळे शिवशंकर यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. तर शिवशंकरच्या या प्रयत्नाला त्याचे कुटूंबियही तेवढ्याच जोमाने साथ देत आहेत.

अनलॉक होताना; शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू होतील असे वाटत होते. मात्र, शाळा अद्यापही बंदच आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शाळेच्या एक एकर मैदानात शेती करण्याचा निर्णय मी घेतला. त्याला पावसाचीही साथ मिळाली असून चांगली पिके येत आहेत. त्यातून भरघोस नसले तरी चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास हातभार लागत आहे. – शिवशंकर पांढरे ( संचालक, महाकिड्‌स सीबीएससी स्कूल), यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.