वाईत मालकाला माथाडी कामगारांची दमदाटी

वाईत मालकाला माथाडी कामगारांची दमदाटी

वाई – येथील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कोल्ड स्टोरेजमधील मालाची चढउतार करण्यासाठी आमच्या हमालांचाच वापर करावा, अशी दमदाटी करत माथाडी संघटनेच्या नावाखाली संबंधित कोल्ड स्टोरेजच्या मालकाला वेठीस धरून काम थांबवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत दहा जणांच्या विरोधात वाई पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या निमित्ताने माथाडी संघटनेच्या नावाखाली होत असलेल्या मुस्कटदाबीचा प्रकार पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, संबंधित कोल्ड स्टोरेजमध्ये मंगळवार, 5 मार्च रोजी ग्रीन पीस व बटर आदी माल तेथील कामगारांमार्फत पिकअप गाडीत भरत असताना दहा जणांनी तेथे येऊन सदरचा माल हमालांशिवाय भरायचा नाही असे सांगत कोल्ड स्टोरेजचे मालक व कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले. सुमारे तीन-चार तास तो माल कोल्ड स्टोरेजच्या बाहेर राहिल्याने पूर्णत: खराब झाल्यामुळे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कोल्ड स्टोरेजच्या मालक पी. डी. शहा यांनी वाई पोलिस स्टेशनमध्ये केलेली आहे.

स्थानिक महिला व पुरुषांना कामासाठी प्राधान्य देत अनेक लहानमोठे उद्योग वाई एमआयडीसीत कार्यरत आहेत. अनेकांचे संसार त्यावर अवलंबून आहेत. मात्र काही अपप्रवृत्तींमुळे मालक आणि कामगार यांच्यातील वातावरण बिघडत आहे. माथाडी संघटनेच्या नावाखाली मालकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याने उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आमच्याच हमालांना काम दिले पाहिजे, अन्यथा उपोषण करून कंपनी बंद पाडू, अशी भीती वारंवार घातली जात आहे.

आधीच नवनवीन उद्योगांची वाई एमआयडीसीत वाणवा असताना, आहे त्या उद्योगांना वारंवार त्रास दिला जात असल्याने असे उद्योग स्थलांतरित झाल्यास अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. काही अपप्रवृत्तींमुळे कष्टाळू व प्रामाणिक स्थानिक भूमिपूत्र रोजगारापासून वंचित राहणार आहेत. गरीब व गरजू महिलांनाही रोजगाराला मुकावे लागणार आहे. शहर व परिसरात अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रिकरण होत होते. मात्र तेथेही काही खंडणीबहाद्दरांमुळे वाईचे नाव खराब झाल्याने वाईला येणारे शुटींगच बंद झाले आहे. त्यामुळे अनेक लहानसहान उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. शुटिंगच्या दरम्यान महिना-दीड महिन्याच्या कालावधीत अनेकांना रोजगार मिळत होता. त्यावरही पाणी फिरले आहे.

…तरच स्थानिकांना रोजगार मिळेल

राडा करून चित्रपट निर्मात्यांना धमकावणे तसेच माथाडीच्या नावाखाली एमआयडीसीतील कंपनी मालकांना वेठीस धरणे, असे प्रकार वारंवार घडू लागले तर त्याचा वाईट परिणाम होऊन अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा प्रवृत्तींना पायबंद घालून चित्रपट निर्माते व एमआयडीसीतील उद्योगधंद्यांना संरक्षण दिले तर एमआयडीसीत विविध प्रकारच्या कंपन्या टिकून राहतील व स्थानिकांना उद्योग धंदे मिळतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)