करोना होऊ नये म्हणून भाजपच्या महिला नेत्यांकडून विमानतळावरच पूजाअर्चा

इंदोर – करोनामुळे सगळे हतबल झाले आहेत. काय केल्यामुळे करोना तुमच्या जवळ येत नाही याचे अनेक उपाय सोशल मीडियावर सांगितले जात आहेत. कोणी काय खाउ नये, काय खावे येथपासून तर कोणती पूजा करावी याचेही सल्ले दिले जातात. काही गोष्टी गंभीरपणे घेतल्या जातात तर काही गंमत म्हणून दुर्लक्षित केल्या जातात.

एक मात्र खरे की अशी धोकादायक स्थिती जेव्हा उदभवलेली असते ते श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील रेषा धुसर झालेली असते व हीच वेळ सावध होण्याचीही असते. त्यातल्या जात ज्यांचे इतर लोक अनुकरण करतात किंवा जे महत्वाच्या पदावर असतात त्यांनी तर फार काळजी घेणे गरजेचे असते. मात्र नेमके तेच आपल्याकडे होत नाही. त्याचे उदाहरण मध्य प्रदेशात पहायला मिळाले. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी करोनापासून लवकर मुक्ती मिळावी, यासाठी पूजा सुरू केली आहे. मात्र, ही पूजा त्यांनी इतर कुठे नसून थेट विमानतळावरच सुरू केली आहे. तसेच, या पूजेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी चेहऱ्यावर मास्क देखील घातला नसल्याचे दिसत असल्यामुळे त्यांची ही पूजा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

उषा ठाकूर यांनी इंदोरच्या विमानतळावर देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर पूजा केली. यावेळी उषा ठाकूर यांच्यासोबत विमानतळ संचालक आर्यमा सन्यास आणि इतर विमानतळ कर्मचारी देखील उपस्थित होते. याआधी देखील उषा ठाकूर अनेक ठिकाणी विना मास्क दिसल्या आहेत. त्यांना हटकल्यानंतर मी रोज हवन करते आणि हनुमान चालीसा म्हणते त्यामुळे मला मास्क घालण्याची आवश्‍यकता नाही, असं उत्तर त्यांनी दिल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. याधी देखील उषा ठाकूर यांनी गायीच्या सुकलेल्या शेणाचा हवन केल्यास घर सॅनिटाईज राहातं, असा दावा केला होता. उषा ठाकूर यांचा विमानतळावरचा व्हिडीओ काही नेटिझन्सनी फेसबुकवर शेअर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.