चिंताजनक.! शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात चिकुन गुनियाचे थैमान

मांडवगण फराटा -शरिराचे सर्व सांधे लॉक, आपल्या शरिरावर हात, पाय व गुडघ्यांवर सूज येऊन आपण जर ठार पांगळे झालो असेल तर, ही चिकन गुनियाची मुख्य लक्षणे आहेत. याच लक्षणांच्या आजाराने शिरूर तालुक्‍यामध्ये थैमान घातले आहे. गावातील प्रत्येक घरात एक तरी रुग्ण दिसून येत आहे.

एका दिवसात एका गावात सरासरी रोज तब्ब्ल 20 ते 25 रुग्ण आढळून येत आहेत. आत्तापर्यंत हजारो जणांना याची बाधा झाली आहे. या आजाराला सामोरे रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरण्याची वेळ आली असून, दवाखान्याचा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे.

एका रुग्णास सरासरी तीन दिवसांच्या सलाईनसह उपचारासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येत आहे. हे सर्व नमूद करण्याचे कारण म्हणजे साथीच्या आजारावर गावागावातील सरकारी आरोग्य विभागाची यंत्रणा या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत कुचकामी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.

काही गावांत तर लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती फक्त आणि फक्त शोभेच्या वास्तू ठरत असून, यामध्ये काम करणारे कर्मचारी या आरोग्य केंद्रात शोधूनही सापडत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र या शब्दाचा अर्थ खरोखरच ‘प्राथमिक’ असाच आहे,

हा शब्द खरा करून दाखविणारे इलाज केंद्र म्हणून तालुक्‍यातील काही केंद्रांना पुरस्कार देण्याची मागणी केली तर वावगी ठरणार नाही, अशी स्थिती आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी एक डॉक्‍टर, 1 सिस्टर,

आशा वर्कर असा किमान स्टाफ आरोग्य केंद्रात काम करीत असतो. परंतु, हा स्टाफ फक्त कामाची हजेरी दाखवण्यापुरता आहे काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. चिकन गुनियाची साथ सध्या तरी तालुक्‍यात आटोक्‍यात येत नाही.

नागरिकांचे घर हेच अळ्यांचे आगार -डॉ. सातपुते
नागरिकांच्या घरामध्येच अळ्यांची पैदास होत असून, घरात तयार झालेले डासांची अंडी घातल्यानंतर आठ दिवसांत पुन्हा नव्या डासांची निर्मिती होत असल्यामुळेच घरात रुग्णांची संख्या वाढत आहे.

हेच डास पुन्हा अंडी घालत असून, तेच डास पुन्हा इतरांना चावतात त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असून नागरिकांनी घरातील पाणी साठे तपासून ते कोरडे केले पाहिजेत ते होत नाही असे डॉ. सातपुते यांनी सांगितले.

‘संपूर्ण महाराष्ट्राला डेंग्यूचा विळखा आहे. एक डास 3-4 किलोमीटर जाऊन बाधा पोहचू शकतो. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे. 30 टक्के जबाबदारी आमची तर 70 टक्के जबाबदारी नागरिकांची आहे.

त्यासाठी नागरिकांनी तुंबलेली गटारी मोकळी करून द्यावी. डबडी, फुटक्‍या बदल्या, टायर यामधील साचलेले पाणी मोकळे करावेत. घरातील पाणी साठे नष्ट करावे आणि आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे केल्यास हि साथ आटोक्‍यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.