चिंताजनक.! खेड तालुक्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची कसोटी

सुपर स्प्रेडर दुकानदारांसह संपर्कातील नागरिकांच्या अँटीजेन चाचण्या वाढल्या

राजगुरूनगर  -खेड तालुक्‍यातील करोनाबाधित व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढली आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची कसोटी लागली आहे. राजगुरुनगर येथे सुपर स्प्रेडर दुकानदारांबरोबरच संपर्कात आलेल्या नागरिकांची अँटीजेन चाचणीतून धक्कादायक आकडा येत असल्याने तालुका करोना विषाणूच्या संकटात आला आहे.

तालुक्‍यात वेगाने वाढणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येमुळे राजगुरूनगर, चाकण, आळंदीसह जवळपासच्या गावात सुपर स्प्रेडरच्या करोना चाचण्या केल्या जात आहेत, यात व्यापारी व्यवसायिकांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक नागरिकांच्या अँटीजेन तपासणी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. राजगुरूनगर शहरातील वाडा रस्त्यावरील अँटीजेन टेस्टसाठी जागा अपुरी पडत आहे.

गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा नाही. नागरिकांना तासन्‌तास उभे राहावे लागत आहे. यामुळे करोनाचा प्रसार आणखी वाढण्याची भीती आहे. शहरात तीन चार व्यक्तींची एकाच वेळी चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव म्हणाले, पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्‍यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मॉर्निग व नाइट वॉकला पूर्णतः बंदी केली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. दुकाने, हॉटेल, मॉल, हातगाड्या, पानटपऱ्या आदी बंद राहणार आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याना प्रत्येकी एक हजार दंड करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी जाणे टाळावे मास्क आणि सोशल डिस्टन्सचा वापर करावा शक्‍यतो घरीच राहावे असे आवाहन त्यांनी केले.

चांडोली ग्रामीण रुग्णालयात व्हेटिलेटर बेड
तीन ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड करुन तीन एम. डी. डॉक्‍टर ठेवण्यापेक्षा एकाच ठिकाणी सर्व व्हेटिलेंटर बेड सुरु केले तर खासगी एम. डी. डॉक्‍टर सेवा देऊ शकतील, अशा सूचना आल्यानंतर चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे नुकतेच रुजु झालेल्या डॉक्‍टरांनी जबाबदारी घेत चांडोली येथेच 11 व्हेंटिलेटर बेड सुरु करण्यास पुढाकार घेतला आहे. चांडोली ग्रामीण रुग्णालयासाठी लागणारी सर्व मदत करण्याची तयारी चांडोली केंद्राचे अधीक्षकांनी घेतली आहे.

आमदारांकडून आढावा बैठक
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये ऑक्‍सिजन बेड व व्हेंटिलेटरच्या सुविधा तालुक्‍यातील बाधित व्यक्तींना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. व्हेंटिलेटरवर रुग्णांसाठी एम.डी. डॉक्‍टर वेळेत मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी निदर्शनास आणून दिले. चांडोलीत सात, आळंदी रुग्णालयात दोन आणि चाकण रुग्णालयात दोन असे 11 व्हेटिलेंटर असताना रुग्ण खासगी रुग्णालयात जात आहे, या सुविधा सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्याना दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.