चिंताजनक.! शिरूरमध्ये ऑक्‍सिजन उपलब्ध; पण बेडच नाही

बेड मिळवण्यासाठी धावाधाव : आता पुन्हा बेड वाढवण्याची आवश्‍यकता

शिरूर -शिरूर तालुक्‍यात करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या 27 रुग्णालयांना पाच ऑक्‍सिजन प्लांटच्या माध्यमातून मागणीनुसार ऑक्‍सिजनचा सुरळीतपणे पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्‍यातील 418 ऑक्‍सिजन बेड सध्या पूर्णक्षमतेने भरले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात आता ऑक्‍सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना मात्र बेडच शिल्लक नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसीलदार लैला शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने तालुक्‍यात विविध गावांमध्ये कोविड सेंटर उघडण्यात आले आहे. तसेच रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.

तर करोना र्संसर्गाची मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना 24 डेडिकेटेड कोविड सेंटर आणि तीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या 24 डेडिकेटेड सेंटरमध्ये 333 आणि कोविड रुग्णालयांमध्ये 85 असे मिळून 418 ऑक्‍सिजन बेड आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार श्रीलेश वट्टे यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील रुग्णालयांना चाकण औद्योगिक वसाहत येथील आरेगा, रायगड, तृप्ती, संदेशा आणि सणसवाडी येथील चिन्मय या पाच ऑक्‍सिजन प्लांटमधून ऑक्‍सिजन पुरवठा केला जातो. तर रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा वेळेत आणि मुबलक मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसांपासून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचा ऑक्‍सिजनपुरवठा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी बंद केला आहे.
– ज्ञानेश्‍वर यादव, नायब तहसीलदार, शिरूर

शिरूर तालुक्‍यातील रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्‍सिजनची गरज लक्षात घेता रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने दररोज 4 टन ऑक्‍सिजन निर्माण करणारा प्लांट सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्‍याला लागणारा दोन मेट्रिक टन ऑक्‍सिजन पुरवठा नियमित उपलब्धता ठेवून जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
– संतोषकुमार देशमुख, प्रांताधिकारी

गेल्या 22 वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायाच्या कारकिर्दीत ऑक्‍सिजनचा एवढा तुटवडा कधीही पाहिला नाही. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या सहकार्याने रात्री-बेरात्री अडचणीच्या काळातही वेगवेगळ्या ठिकाणाहून हॉस्पिटलला ऑक्‍सिजन पुरवठा झाल्याने रुग्णांचे प्राण वाचले आहेत. कधी नव्हे असे पाठ थोपटण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
– डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर, विघ्नहर्ता हॉस्पिटल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.