सोलापूर – पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची संख्या वाढत असतानाच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पलमध्ये “मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ला कारणीभूत बुरशीजन्य जीवाणू पहिल्यांदाच आढळल्याचा दावा बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे-मांडे यांनी केला आहे.
रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पलचे संशोधन चालू असताना त्यामध्ये अस्परजिलॉसिस व कॅन्डीडीयासिसबरोबर दुर्मिळ अशा फ्युजॅंरिओसीस आणि अल्टरनेरियासिस या रोगांचे बुरशीजन्य जीवाणू आढळल्याचे अमृता शेटे-मांडे यांनी सांगितले.
क्लिनिकल सॅम्पलमधील जंतूंचा अभ्यास करण्यासाठी असे जंतू पोषक आहार माध्यमात वाढवावे लागतात. अशा प्रकारे सर्व घटक योग्य प्रमाणात देऊन आम्ही जेव्हा बुरशी वाढविण्याचा प्रयोग केला तेव्हा एका मागून एक वेगवेगळ्या बुरशींची वाढ झाल्याचे पाहून आम्ही चक्रावून गेल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
आढळलेल्या बुरशींपैकी फ्युजॅंरिओसीस व अल्टरनेरियासिस या रोगांच्या बुरशींच्या माणसात झालेल्या संसर्गाची फारच कमी उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांची गणना दुर्मिळ प्रकारात होते. आजपर्यंत पोस्ट कोविड रुग्णात अशा प्रकारच्या मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शनमधील दुर्मिळ बुरशी आढळल्याचा हा पहिलाच रिपोर्ट असल्याचा दावा डॉ. सुहास कुलकर्णी यांनी केला आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णात दुर्मिळ अशा बुरशींच्या पहिल्यांदाच केलेल्या नोंदीमुळे ऑपरेशन करणाऱ्या व उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा दृष्टिकोन बदलणार असून त्याचा फायदा रुग्णांनाच होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.