बारामती/ जळोची -बारामतीत दिवसेंदिवस करोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील पाच दिवसांत सातशेंवर रुग्ण आढळले आहेत. करोना रुग्णांचा वाढता आकडा नागरिकांसह प्रशासनांची चिंता वाढवणारा ठरला आहे. सध्या बारामतीतील दोन्ही शासकीय रुग्णालय व चार ठिकाणी उभारलेले कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. हा संसर्ग जादा वाढल्यास संपूर्ण टाळेबंदीची शक्यता व्यक्त होत आहे.
वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून म्हणून शहरातील आठवडे बाजार पुढील अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच अस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले आहेत.
बारामती येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज, नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने येथील शासकीय डॉक्टर आंबेडकर वसतिगृह तसेच तारांगण महिला शासकीय वसतिगृह व माळेगाव कोविंड केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. अनेक खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. दरम्यान, प्रशासनाने कडक अंमलबजावणी करीत उपाययोजना राबविल्या आहेत.