पुणे – गेल्या काही दिवसांपासून देशातील व राज्यातील करोना प्रसाराचा वेग मंदावल्याने चिंतेचे काळे ढग दूर होताना दिसत होते. मात्र अशातच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने जगभरामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा हा प्रकार जुन्या प्रकारापेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अशातच आता भारतामध्ये देखील करोना विषाणूचा हा नवा प्रकार आढळून आला आहे.
COVID-19: Six UK returnees found positive for new UK variant genome pic.twitter.com/yB79DCZpgf
— ANI (@ANI) December 29, 2020
ब्रिटनवरून भारतात परत आलेल्या सहा प्रवाशांमध्ये करोनाचा हा नवा प्रकार आढळून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरू येथील NIMHANS संस्थेत तीन जणांचे, हैदराबाद येथील CCMB संस्थेत 2 तर पुण्यातील NIV प्रयोगशाळेत एका जनाचा करोना अहवाल विषाणूच्या नव्या प्रकारासाठी पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रिटनमधून पुण्यात आलेल्या 109 प्रवासी “नॉट रिचेबल’
पॉझिटिव्ह आलेल्या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतामध्ये करोनाच्या नव्या प्रकाराने एन्ट्री घेतल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना बाबतच्या सुरक्षिततेच्या उपायांचे काटेकोर पालन करणे गरजेचे ठरणार आहे. तसेच ब्रिटनखेरीज जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा हा नवा प्रकार आढळून आल्याने तेथील प्रशासन खडबडून जागे झाले आहे.