जिनिव्हा – करोनाच्या साथीमुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाल्याचा परिणाम म्हणून आता क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. क्षयरोगाला आटोक्यात आणण्यासाठी कित्येक दशकांपासून केल्या गेलेल्या प्रयत्नांवर करोनाच्या साथीमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
संपूर्ण जगाच्या पातळीवर हा धोक्याचा इशारा ध्यानात घेतला जायला हवा. क्षयरोगाची बाधा झालेल्या लक्षावधी लोकांच्या तपासण्या, उपचार आणि काळजीमध्ये निर्माण झालेली तफावत भरून काढण्यासाठी लवकरात लवकर मोठी गुंतवणूक आणि नाविन्यतेची भर घातली जायला पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनान घेब्रायसिस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
करोनाच्या साथीमुळे जगभरात क्षयरोगाच्या रुग्णांच्या तपासण्या आणि उपचारांकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक रुग्णांच्या तपासण्या आणि उपचारही झालेले नाहीत, असे “डब्लूएचओ’ने 2020 या वर्षासाठीच्या क्षयरोगाविषयीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. 2019 मध्ये क्षयरोगाचे जगभरातील रुग्ण 29 लाखांच्या आसपास होते. मात्र गेल्या दोन वर्षात जगभरात सुमारे 41 लाख लोकांना क्षयरोग झालेला आहे.
मात्र त्याचे अधिकृत निदान झालेले नाही. त्यामुळे त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. तसेच त्यांच्यावर उपचारही होऊ शकलेले नाहीत. करोनाच्या साथीमुळे क्षयरोगावरील उपचारासाठीचा निधी करोनाच्या उपचाराकडे वळवण्यात आला आहे, असेही “डब्लूएचओ’ने म्हटले आहे.