झोपडपट्टीत वेगाने पसरतोय करोना
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महापालिकेच्या सर्व आठही प्रभाग कार्यालयांच्या हद्दीत “करोना’ने शिरकाव केला असून “करोनामुक्त’ भागातही या आजाराने प्रवेश मिळविला आहे. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे झोपडपट्टी परिसरात “करोना’ वेगाने पाय पसरत आहे.
शहराच्या आठही क्षेत्रीय प्रभाग कार्यालयांच्या हद्दीत करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. “अ’ प्रभागात येत असलेला संभाजीनगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन परिसर करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या प्रभागात सातत्याने करोनाचे रुग्ण आढळत आहेत. “ब’ प्रभाग कार्यालयातंर्गत येत असलेल्या रावेत, किवळे, विकासनगर, चिंचवडेनगर, चिंचवड हा भाग अनेक दिवस “करोना’पासून मुक्त होता. परंतु किवळे विकासनगर भागात आता तीन रुग्ण आढळल्याने शहरातील कोणतेही प्रभाग कार्यालय “करोना’पासून मुक्त राहू शकले नाही.
पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहराच्या विविध भागात करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. करोनबाधितांनी सव्वा दोनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्चपासून शहरातील 226 जणांना करोनाची लागण झाली आहे.
“अ’ प्रभाग हॉटस्पॉट
संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या “अ’ प्रभागाच्या हद्दीत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रभागातील संभाजीनगर, आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हा प्रभाग करोनाचा हॉटस्पॉट झाला असून येथे 20 हून अधिक रुग्ण आहेत.
“अ’ प्रभागातीलच निगडी, प्राधिकरणात एकही करोनाचा रुग्ण नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर तळवडे, रुपीनगर परिसरात येत असलेला “फ’ प्रभागात सुरुवातीला सर्वांत अधिक रुग्ण होते. परंतु रुग्ण बरे होत असल्याने येथील सक्रिय रुग्णांचा आकडा दहापर्यंत खाली आला आहे. सद्यस्थितीत शहारातील आठ ही प्रभागात “करोना’चे उपचाराधीन रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.