चिंताजनक ! मुंबईत आढळले ‘म्युकोरमायकोसिस’चे तब्बल १११ रुग्ण

मुंबई– देशात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृतांचे प्रमाणही वाढले आहे. करोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असून आता करोना रुग्णांना म्युकोरमायकोसिस या आजाराची भीती निर्माण झाली आहे. करोनातून वाचलं तरी हा आजार रुग्णांसाठी घातक ठरत आहे. राज्यात या आजाराचा पहिला बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच मुंबईत या आजाराचे १११ रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत अजून करोनाचं थैमान सुरूच आहे. म्युकरमायकोसिसने डोक वर काढलं आहे. या  आजाराचे मुंबईत १११ रुग्ण आढळल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु यातील बहुतेक रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आजच्या स्थायी समिती सभेत म्युकर मायकोसिस आजाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईत शीव रुग्णालय 32, केईएम रुग्णालय 34, नायर रुग्णालय 38 आणि कूपर रुग्णालय 7 रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. सदर आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. तसेच आजाराची उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत निश्चिती केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान या आजारात रुग्णांच्या नाकामध्ये काळ्या रंगाची बुरशीची वाढ होऊ लागते. त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ती डोळे आणि मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते. आजार जास्त बळावला तर रुग्णाचे डोळे काढावे लागणे किंवा मृत्यूसुद्धा संभवतो.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.