टोकियो – जपानमधील आणिबाणी उठल्यावर आता ऑलिंपिक संयोजन समितीने ऑलिंपिकमधील प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी १० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता टोकियो ऑलिंपिकमधील एकेक अडथळे आता दूर होऊ लागले आहेत.
याशिवाय पॅरालिंपिकबाबतचा निर्णय १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे जपानी नागरिकांनाही उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आयओसी, आयपीसी, टोकियो २०२० संयोजन समिती, टोकियो शहर सरकार आणि जपान सरकार या पाच जणंमध्ये आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यास नकार देण्यात आला होता.
मात्र, ऑलिंपिकसाठी स्टेडियम क्षमेतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी दिली असून ती १० हजार पेक्षा जास्तही असू नये अशी अटही घातली आहे.
प्रेक्षकांसाठी नियमावली
-प्रत्येक केंद्रावर चेहऱ्यावर कायम मास्क आवश्यक
-जोराने ओरडणे किंवा बोलण्यास निर्बंध
-मैदानात बसताना सुरक्षित अंतर महत्वाचे
-खेळ शांतपणे पाहावा
-खेळ संपल्यावर थेट घरी जावे
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा धोकादायक!
जपानमधील एका सर्वेक्षणात ८३ टक्के नागरिकांनी ऑलिंपिकमुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे. यापैकी ५३ टक्के नागरिकांनी प्रेक्षकांविनाऑलिंपिक व्हावे असे मत व्यक्त केले आहे, तर प्रेक्षकक्षमता मर्यादित असावी, असे ४२ टक्के नागरिकांनी म्हटले आहे.