जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा | इलिंगवर्थ व गॉफ यांची पंच म्हणून नियुक्‍ती

दुबई – आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मैदानावरील पंच, तिसरे व चौथे पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गॉफ मैदानावरील पंच असतील तर, रिचर्ड केटलबरो हे तिसरे (टीव्ही पंच)तर, अलेक्‍स व्हार्फ हे चौथे पंच म्हणून काम पाहणार आहेत. सामनाधिकारी म्हणून ख्रिस ब्रॉड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान साऊदम्प्टन येथे हा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्यात कसोटी सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ 15 जून रोजी या अंतिम सामन्यासाठी बायो बबलमध्ये दाखल होणार आहे. या सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय सामनाधिकारी घेणार असून हा सामना अनिर्णित राहिला किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल.

दोन्ही संघांची कामगिरी

न्यूझीलंडविरुद्ध आजवर खेळल्या गेलेल्या मालिकांमध्ये भारताची यशाची टक्केवारी जास्त सरस आहे. या दोन संघांत क्रिकेटच्या तीनही प्रकारात मिळून एकूण 185 सामने खेळवले गेले आहेत. त्यात भारतीय संघाने 82 तर, न्यूझीलंडने 69 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले गेले असून भारताने 21 तर न्यूझीलंडने 12 कसोटी सामने जिंकले आहेत. 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने 55 तर, न्यूझीलंडने 49 विजय मिळवले आहेत. या संघांत 16 टी-20 सामने असून भारताने 6 तर, न्यूझीलंडने 8 सामने जिंकले आहेत.

मानसिक शांततेसाठी मिळणार ब्रेक

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतर तब्बल 20 दिवसांचा ब्रेक दिला जाणार आहे. संघातील सर्व खेळाडू सातत्याने बायोबबलमध्ये राहात असून मानसिक शांततेसाठी ही विश्रांती अत्यंत आवश्‍यक आहे. तसेच या खेळाडूंना बायोबबल सुरक्षेतून बाहेर जाण्याचीही परवानगी देण्यात आली असून या कालावधीत तसेच मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी केली जाणार आहे.

भारत व न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना येत्या 18 ते 22 जून या कालावधीत साउदम्पटन येथे होणार आहे. या सामन्यानंतर मिळालेला ब्रेक संपल्यावर 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. कसोटी अजिंक्‍यपद सामन्यानंतर भारतीय संघाला देण्यात येत असलेला 20 दिवसांचा ब्रेक अत्यंत आवश्‍यक आहे.

इंग्लंडविरुद्धची मालिका तसेच अमिरातीतील आयपीएल स्पर्धा तसेच त्यानंतर होत असलेली टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा असे अत्यंत व्यस्त वेळापत्रक पाहता खेळाडूंसाठी ब्रेक महत्वाचा ठरणार आहे. सातत्याने सामने खेळल्यामुळे तसेच बायोबबल सुरक्षेत राहावे लागत असल्यामुळे खेळाडूंना अशा ब्रेकची नितांत गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहीती बीसीसीआयने दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.