#जागतिक_चिमणी_दिन_विशेष : ‘चिऊताई’साठी शंभर कृत्रिम घरटी!

तीस ‘बर्ड फिडर’; इंदोरी व कान्हेवाडी येथील तरुणांचा उपक्रम

इंदोरी  – निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. “एक घास चिऊचा…’ सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दूर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वाटू लागली आहे.चिऊताईच्या गोष्टी बाळाला सांगून घास भरविणाऱ्या आईच्या नजरेलाही आता चिमणी दिसेनासी झाली आहे.

जागतिक चिमणी दिन म्हणून 20 मार्च हा दिवस सर्वत्र पाळला जातो. चिमणीसाठी अन्न-पाण्याची सोय आपल्या घरासमोर करा, असे आवाहन पक्षीमित्र भूषण ढोरे, गणेश हिंगे, हर्षद दोंदे, विनोद येवले, ऋषिराज लोंढे, तुषार दिवसे, राहुल येवले, निलेश येवले, सागर दिवसे, धर्मराज दिवसे यांनी केले. यामध्ये टाकाऊ निरपयोगी प्लॅस्टिकचे कॅड, लाकडी फळीचे कृत्रिम घरटे, बर्ड फिडर या कडक उन्हाळ्यामध्ये चिमण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था या तरुणांद्वारे करण्यात आली आहे.
मावळ तालुकातील पूर्व भाग इंदोरी (भंडारा डोंगर), फिरंगाईदेवी डोंगर पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्‍यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. इंदोरी शहरात तर चिमण्यांचा “चिवचिवाट’ तर
हरवल्यासारखाच आहे.

डोंगर दऱ्यांमध्ये साग, बाभूळ, भेंडी, बोर, कळक, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, निलगिरी आदी झाडे आहेत.
गेल्या काही वर्षांत डोंगरदऱ्या मध्येही बंगले, फार्महाऊस बांधण्यात आले आहेत. मानवी वावर वाढल्याने आणि पर्यावरणाची काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये मोबाईल टॉवरची गर्दी दिसत आहे. काही टॉवर हे घराच्या स्लॅबवर आहेत. मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
पूर्वी घरांमधील आजोबांसह देवदेवतांची छायाचित्र लावलेले असायचे. त्यांच्या मागे चिमण्या घरटी करून राहत. पण, आता कॉंक्रिटच्या भिंतींमुळे चिमण्यांना घरटी करायला चांगली जागाच मिळत नाही.

आता या संस्कृतीचे दर्शनही दुर्लभ होत आहे. मोबाइल टॉवरपासून इमारतीच्या मालकास दरमहा चांगले उत्पन्न मिळते. मात्र, त्यामुळे निष्पाप चिमण्यांचा बळी जात आहे. चिमण्या व अन्य पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी तर क्वचित एखादी चिमणी दिसते. पूर्वी शेतामध्ये धान्य असायचे. तेथे चिमण्यांचे थवे असायचे. धान्य काही ठिकाणी अळ्या, किडे खायला मिळायचे. आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून धान्य येत असल्यानं चिमण्यांची उपासमार होऊ लागली आहे. शिवाय मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींमुळे चिमण्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

“चिमण्यांवर प्रेम असल्याने त्यांच्याबद्दल सर्वांना चिंता आहे, प्रत्येकाने अंगणात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवावी, त्यासाठी कोठे तरी सुरुवात म्हणून आम्ही 100 कृत्रिम लाकडी घरटी आणि 30 बर्ड फीडर बसवत आहोत यामध्ये पुढे नक्‍कीच वाढ होईल.
– भूषण ढोरे, पक्षीप्रेमी.

बदलती जीवनशैली पक्ष्यांच्या जीवावर

मानवी जीवनशैलीत बदल होऊ लागल्याने चिमण्यांना अन्नही सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि घरटेही बांधणे अवघड झाले आहे. घरात कीटक येऊ नयेत म्हणून दारे व खिडक्‍यांना जाळ्या बसविल्या जातात. पूर्वी वाडे, कौलारू घरांमध्ये मोकळ्या जागा असायच्या. आता बांधकामात चिमण्यांना राहता येईल, एवढीही मोकळी जागा सोडली जात नाही. पूर्वी चिमण्या, गाई, कुत्र्यांना अन्न देण्याची संस्कृती होती. गेल्या काही वर्षांमध्ये या संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.