#जागतिक_चिमणी_दिवस : कमी होऊ लागला चिव-चिवाट

अभ्यासकांचा निष्कर्ष : गेल्या दहा वर्षांत शहरात चिमण्यांचे प्रमाण घटले

पिंपरी – आपल्या चिवचिवाटाने प्रत्येक सकाळ प्रसन्न करणाऱ्या चिमुकल्या चिमण्याचे प्रमाण शहरात खूपच वेगाने घटन चालले आहे. पूर्वीपासूनच मनुष्यवस्तीच्या जवळ राहणाऱ्या चिमण्या हळू-हळू कमी होऊ लागल्या आहेत. वाढते शहरीकरण तसेच घटत्या हरितपट्ट्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरामध्ये गेल्या 10 वर्षाच्या कालखंडात मोठी घट झाली असल्याचा निष्कर्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण समितीच्या अभ्यासकांना काढला आहे.

या समितीने संपूर्ण शहरातील पर्यावरण आणि जैव-विविधतेवर दोन वर्षे अभ्यास करुन नोंदवलेल्या निरीक्षणामध्ये सुमारे 65 टक्‍के चिमण्या कमी झाल्याचे लक्षात आले आहे. निदर्शनास आली आहे. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. चिमणी तसा माणसाळलेला पक्षी, भारतात जवळजवळ सर्वच परिसरात आढळून येणारा पक्षी. धान्य, कीटक, फुलांचे अंकुर, मध,शिजवलेले अन्न ग्रहण करणारा पक्षी स्वतःचे घरटे बनविण्यासाठी गवत, बारीक काटक्‍या, पिसे, बदलत्या परिस्थितीत प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे यांचा वापर करतो.

मुख्य कारणे

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा मुख्य सहायक म्हणून महत्वाचा दुवा असणाऱ्या पक्षी प्रजातींचा अभ्यास पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील अभ्यासक करीत आहेत. दुष्काळाची झळ, वाढते शहरीकरण, वृक्षतोड, नष्ट झालेले जलस्रोत, ओढे नाल्यांवर झालेले अतिक्रमण, वाढते प्रदूषण, कंपन्यांनी उघड्यावर टाकलेला रासायनिक कचरा, वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाकडे झालेले पालिकेचे दुर्लक्ष, उद्यानांसाठी अपुरा रोप पुरवठा, घटत चाललेला शहराचा हरितपट्टा, मोबाईल टॉवरची वाढती संख्या अश्‍या अनेक कारणांमुळे पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष्यांची संख्या गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. जानेवारीत केलेल्या पाहणीमध्ये लक्षात आले आहे की शहरातील काही परिसरात फक्त 35 टक्केच चिमण्या आता दिसून येत असून 65 टक्के चिमण्या स्थलांतरित अथवा नामशेष झाल्या आहेत.

वाढत्या शहरीकरणाचा सर्वात मोठा फटका चिमणी – सुगरण चिमणी आणि काळी चिमणी यांना बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घराच्या अंगणात तसेच घरातील खिडक्‍या बाल्कनीत बागडणाऱ्या चिमण्या आता दिसेनास्या झाल्या आहेत. शहराच्या विविध परिसरात जेव्हा पाहणी केली व खालील महत्वपूर्ण निरीक्षणे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचे अभ्यासक विजय जगताप, विजय मुनोत, मंगेश घाग, संदीप सकपाळ, यांनी नोंदवली.

उपाययोजनांची गरज

पालिका प्रशासनाने हरितपट्टा (ग्रीन झोन) वाढीस लागण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आवश्‍यक. त्याचप्रमाणे त्यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी पुढील पंचवार्षिक ग्रीन योजना हातात घेणे आवश्‍यक. मोबाईल टॉवर परिसरात वृक्षलागवड जास्त प्रमाणात करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे घातक चुंबकीय लहरींपासून पक्ष्यांचे संरक्षण होईल. नदी परिसरातील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी पक्षी संवर्धन झोन निर्माण करण्यास पालिकेने पुढाकार घ्यावा. नागरिकांनीही कृत्रिम घरटी, धान्य व पिण्यासाठी जल बाल्कनी तसेच घराच्या आजूबाजूला ठेवून चिमणीची अन्नसाखळी भक्कम करावी.

-रहाटणी, चिखलीचा काही भाग, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव शहरी भाग, पिंपळे सौदागर, बिजलीनगर, थेरगाव, हिंजवडी, वाकड ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिमण्यामध्यें घट दिसून आली.
-शहरातील नेहरूनगर चा घनदाट वस्तीचा भाग, पिंपरी कॅम्प,मध्य चिंचवड परिसराचा भाग, निगडी मध्यवर्ती परिसर, भोसरी मध्यवर्ती, निगडी ट्रान्स्पोर्टनगरी या ठिकाणी चिमणीची उपस्थिती अगदी नगण्य राहिली आहे. म्हणजे या ठिकाणाहून चिमणी जवळजवळ नामशेष झालेली आहे.
-वाल्हेकरवाडी, रावेत परिसर, पवना नदी परिसराचा भाग, पुनवळे, शाहूनगर, इंद्रायणीनगर, मोशी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, तळवडे परिसरात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो.
-आनंदाची बाब म्हणजे प्राधिकारणातील उद्याने, दुर्गादेवी टेकडी परिसर, पेठ क्रमांक 24,25,26,27 गणेश तलाव परिसर या ठिकाणी चिमण्यांची उपस्थिती लक्षणीय निदर्शनास आली.

 

“वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पिंपरी चिंचवडच्या मोठा भूभाग हा प्रदूषित झालेला आहे. कीटकांची नैसर्गिक वंशवृद्धी नियमन करण्याचे मोठे कार्य चिमणी करीत असते. आज उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात उंच इमारतींचे बांधकाम सुरू असून शेत जमीन पूर्णतः नष्ट झाल्यामुळे धान्य चिमण्यांना उपलब्ध राहिले नाही. त्यामुळेच चिमण्या 35 टक्के प्रमाणावर येऊन ठेपल्या आहेत.
– विजय पाटील, अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती

Leave A Reply

Your email address will not be published.