23 जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिन विशेष
– स्वप्नील भालेराव ( सुलेखनकार )
संगणक, मोबाईल स्क्रिनच्या स्मार्ट हाताळणीच्या, व्हॉट्सप, फेसबुकच्या जमान्यात हस्ताक्षराचे अस्तित्व असणार की नसणार? असा प्रश्न निर्माण होतो परंतु या काळात देखील हस्ताक्षराला अनन्य साधारण महत्व आहे. याचसाठी जगभरातील अक्षरप्रेमी 23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिवस म्हणून साजरा करतात. जागतिक हस्ताक्षर दिवसाच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात…
हस्ताक्षरामुळे स्वत:चे वेगळेपण सिद्ध होते. तसेच पेनने लिहितेवेळी बोटांची होणारी हालचाल ही ज्ञान-वृद्धीसाठी, भाषा-प्रभुत्वाच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश-वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते, हे मानस-शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. हातात पेन किंवा पेन्सिल धरून बोटाची भोवर्यासारखी फिरणारी गरगर किंवा वक्राकार हालचाल करत एकामागोमाग एका ओळीत अक्षरे लिहीत जाण्याने लिहिणार्याचा मेंदू कार्यरत होतो आणि भाषेची सफाई वाढण्यास मदत होते. स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्याने निर्मिती-क्षमता वाढते. आविष्कार-कुशलता वाढते. विचार-क्षमता, स्मरण-शक्ती आणि भाषा-प्रभुत्व यासाठी मेंदूचा जो भाग जबाबदार असतो, तो अधिक कार्यक्षम करण्यासाठी पेन्सिल वा पेन यांच्या साह्याने सरळ, वक्राकार, गोलाकार अशी एकेका अक्षराला पूर्णता आणत लिहिणे हे शिकण्याच्या प्रक्रियेला साह्यभूत ठरणारे आहे.