नवी दिल्ली – देशातील 2018 मधील व्याघ्र गणनेचा विश्वविक्रम प्रस्थापित केला असून कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठी व्याघ्र गणना म्हणून या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. “ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2018′ च्या व्याघ्रगणनेचा निकाल गेल्यावर्षी जागतिक व्याघ्रदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 75 टक्के म्हणजे 2,967 वाघ भारतात आढळले आहेत.
हे एक मोठे यश असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. “अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताचे हे मोठे चमकदार उदाहरण आहे. असे जावडेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने वाघांची संख्या दुप्पट करण्याचा आपला संकल्प वेळेपूर्वीच पूर्णत्वास नेला आहे. असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.
2018-19 मध्ये कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या गणनेमध्ये वन्य जीवांचे 3,48,58, 623 फोटो घेतले गेले. त्यामध्ये 76, 651 वाघांचे आणि 51, 777 फोटो बिबट्यांचे होते. तर उर्वरित फोटो हे वनसंपदेचे होते.
या फोटोंपैकी 2,461 फोटो हे केवळ वाघांचे होते. त्यात वाघांच्या बछड्यांचा समावेश नव्हता. स्ट्राईप पॅटर्न रेकग्निशन सॉफ्टवेअरच्या मदतीने या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली होती.