वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांंमधून माघार घेण्याच्या ज्यो बायडेन यांच्या निर्णयाचे जागतिक नेत्यांनी स्वागत केले आहे. वाढलेले वय आणि प्रकृतीचा विचार करता त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे अनेक नेत्यांनी म्हटले आहे. बायडेन हे महान व्यक्ती असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेली प्रत्येक कृती प्रेमापोटी केल्याचे ट्रुडो म्हणाले. वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धामध्ये बायडेन यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेरझोक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्यावेळी युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनीही बायडेन यांच्याना धन्यवाद दिले आहे.
रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन प्रसंगी बायडेन यांनी दिलेल्या पाठिंब्याप्रमाणे भविष्यात अमेरिकेचा युक्रेनला मिळणारा पाठिंबा कायम राहिल, अशी आशाही झेलेन्सकी यांनी व्यक्त केली. तर अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोणीही असले तरी रशियाच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव्ह यांनी म्हटले आहे.
बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्रिटनबरोबरचे सलोख्याचे संबंध यापुढच्या उर्वरित काळात कायम राहण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर काम करणार असल्याचे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे. लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी बायडेन यांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज यांनी बायडेन यांना धन्यवाद दिले आहे. तर जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ यांनी बायडेन यांचे वर्णन जवळचा मित्र असे केले आहे. बायडेन यांनी घेतलेला निर्णय धाडसी आणि प्रतिष्ठा कायम ठेवणारा असल्याचे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅन्चेझ यांनी म्हटले आहे. तर बायडेन यांनी नेहमी लोकशाहीसाठी संघर्ष केल्याचे पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी म्हटले आहे.