जगात जर्मनी, अन्‌ भारतात..?

जगात जर्मनी, अन्‌ भारतात परभणी’ ही म्हण मराठवाड्यात प्रचंड “फेमस’ आहे. त्याची कारणे शेकडो असतील. पण, त्यातल्या त्यात उल्लेख करण्याजोगं म्हणजे इथलं राजकारण. सन 2004 पासून येथे जिंकलेला प्रत्येक खासदार नंतरच्या काळात कोठे जातो, याचा अंदाज लावता येत नाही. अपवाद यंदाची निवडणूक. पण, तरीही 1998 वगळता 1989 पासून या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. 1999 मध्ये जिंकलेले सुरेश जाधव राजकारणापासून दूर गेले. 2004 मध्ये येथून तुकाराम रेंगे पाटील जिंकले. त्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळले.

तेव्हांपासून त्यांचा “आवाज’च नाही. 2009 मध्ये रेंगे पाटलांचे “राष्ट्रवादी’ प्रेम पाहून शिवसेनेने त्यांचे तिकीट कापले आणि जनतेने ऍड. गणेश दूधगावकर यांना उमेदवारी दिली. पण, तरीही जनतेने पुन्हा शिवेसेनेवर विश्‍वास दाखवत दूधगावकरांना दिल्लीत पाठविले. त्यानंतर पहिल्या 3 वर्षांतच दूधगावकर “मातोश्री’पासून दुरावले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत संजय जाधव जिंकून आले. या मतदासंघाचा इतिहास पाहिला, तर 1989 आणि 1991 मध्ये अशोकराव देशमुख यांच्या व्यतिरिक्‍त एकाही उमेदवाराला दुबार संधी मिळाली नाही. पण, आता संजय जाधव त्याला अपवाद ठरले आहेत.

ही झाली पार्श्‍वभूमी. पण, आता गंमतीचा भाग म्हणजे, शिवसेनेपासून दुरावलेले आणि राष्ट्रवादीत कार्यरत (?) असलेले ऍड. गणेश दूधगावकर यांचे चिरंजीव समीर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत युतीचे उमेदवार संजय जाधव यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेकडून तिकिटाची अपेक्षा धरून बसलेल्या ऍड. गणेश दूधगावकर यांच्या घरातूनच आता राष्ट्रवादीविरोधी प्रचार सहन करावा लागत आहे. तर, नाराजी न दाखविता अलिप्तता दाखवत दूधगावकर आता वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे कळते आहे. त्यामुळे दूधगावकर यांची अवस्था लक्षात घेता परभणीतही “नगर पॅटर्न’ झाल्याची चर्चा आहे. तर, समीर दूधगावकर यांना विधानसभेची अपेक्षा आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेता यंदाही या मतदारसंघात शिवसेनेचा “आवाज’ घुमणार का, असा प्रश्‍न आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)