वर्ल्ड हायपरटेन्शन डे : कोविड-१९ च्या काळात हायपरटेन्शनचे व्यवस्थापन

कोविड-१९ साथीच्या परिणामांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले असताना, उच्च रक्तदाबाचा (बीपी) त्रास असलेल्यांना गंभीर स्वरूपाच्या गुंतागुंतींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. हायपरटेन्शन किंवा अतिरक्तदाब ही भारतात नेहमीच गंभीर वैद्यकीय अवस्था समजली जाते.

या अवस्थेमुळे हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि अन्य अवयवांना असलेला विकारांचा धोका बराच वाढतो. अनेक जणांना तणाव, अनारोग्यकारक आहार यांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, तर काही जणांना आनुवंशिकतेने हा त्रास होतो.

अमेरिका आणि भारतातील काही संशोधनांत असे दिसून आले की, कोविड-१९ आजाराने मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये या २-३ धोक्याच्या घटकांपैकी एक असतो. अर्थात याचे अचूक असे कारण देता येणार नाही पण अनेक सिद्धांतांचे दावे यासाठी केले जातात.

कोविड-१९ आजाराचा संसर्ग होण्यास कारणीभूत असलेल्या उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या अन्य समस्यांचे एक कारण कमकुवत प्रतिकारशक्ती हे असते. दीर्घकालीन विकार आणि वाढत जाणारे वय यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि विषाणूशी लढा देणे शरीराला कठीण होऊन बसते. म्हणूनच अशा कठीण काळात हायपरटेन्शनचे व्यवस्थापन करणे आणि जीवनशैलीत काही बदल करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.

काही प्रतिबंधात्मक उपाय:
योग्य आहार घेऊन आरोग्य चांगले राखणे: वैद्यकीय तज्ज्ञ रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या उपचारांचा सल्ला देतात. काही जणांना ते आहारविषयक सवयींमध्ये बदल करून पोटॅशिअमने समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला देतात. संत्री, केळी, पालक, ब्रॉकोली आदींमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

सोडिअमयुक्त अन्नपदार्थ टाळणे:
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खाणे व पॅकेज्ड अन्नपदार्थ टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, सोडिअममुळे रक्तदाबात तत्काळ वाढ होते.

पुरेसा शारीरिक व्यायाम करणे:
प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे. जेवढा व्यायाम अधिक केला जाईल, तेवढे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सोपे होईल. आठवड्यातून चार दिवस ३० मिनिटे सौम्य स्वरूपाचे व्यायाम केले तरीही शरीरात बदल घडून येतात.

पुरेशी झोप घेणे:
झोपेचा आरोग्याशी थेट संबंध आहे. ८ तास व्यवस्थित झोप घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यात मदत होते. सहा तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या रक्तदाबात जलदगतीने वाढ होते. झोपेच्या स्थितींवर बरीच माहिती उपलब्ध आहे. झोपताना शरीराचे आरेखन योग्य राखल्यास हायपरटेन्शनच्या व्यवस्थापनात मदत होऊ शकते.

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या व जनुकीय चाचण्यांमध्ये गुंतवणूक करणे:
कुटुंबातील इतिहास व जनुकीय रचना हे बहुतेक आजारांबाबत धोक्याचे घटक असतात. तुमची एकंदर आरोग्यविषयक पूर्वस्थिती जाणून घेण्यासाठी जेनेटिक टेस्टिंग किंवा जनुकीय चाचण्या उपयुक्त ठरतात, कारण हायपरटेन्शनसारख्या अवस्थांचा परिणाम दृष्टी, मूत्रपिंड आणि हृदयासारख्या अन्य अवयवांवर होतो.

संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतल्यास तुम्हाला योग्य जीवनशैली आखण्यात आणि वैद्यकीय अवस्थांचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत मिळते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आपला रक्तदाब आणि अन्य संबंधित आरोग्य अवस्थांसाठी नियमित तपासण्या करून घेत राहणे उत्तम.

औषधे नियमित घेणे:
हायपरटेन्शनच्या रुग्णांनी रक्तदाबाची पातळी सामान्य असतानाही नियमित औषधे घेतली पाहिजेत. औषधांमध्ये काही बदल असल्यास त्यांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण चालू असलेली औषधे त्याशिवाय थांबवू नयेत.

  • अमोल नायकवडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.