आज जागतिक हृदयदिन

डॉ. शिरीष हिरेमठ
हार्ट ऍटॅकच्या तुलनेत हार्ट फेल्युअरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हार्ट फेल्युअर (एचएफ) आणि हार्ट ऍटॅक (एचए) यांत अनेकदा गल्लत केली जाते. हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे. हार्ट ऍटॅक आणि हार्ट फेल्युअर हे दोन वेगवेगळे कार्डिओव्हस्क्‍युलर विकार आहेत. त्यांची कारणे व त्यांवरील उपचार पूर्णपणे वेगवेगळे आहेत. सध्या भारतात कार्डिओव्हस्क्‍युलर विकारांचे (सीव्हीडी) प्रमाण प्रचंड वाढत आहे. सर्व प्रकारच्या सीव्हीडींमध्ये हार्ट फेल्युअरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे तसेच रुग्णांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात 8 ते 10 दशलक्ष लोकांना हार्ट फेल्युअरचा त्रास आहे.

हार्ट फेल्युअरच्या रुग्णांपैकी 59 टक्के जणांना निदान झाल्यापासून किमान एकदा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्रिवेंद्रम हार्ट फेल्युअर रजिस्ट्रीनुसार, निदान झाल्यापासून एक वर्षाच्या आत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला, भारतात दरवर्षी सुमारे 20 लाख जणांना हार्ट ऍटॅक येत आहे. याचा अर्थ हार्ट फेल्युअर ही भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढील सर्वांत मोठी समस्या आहे.

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?
पंपिंगच्या क्रियेची जबाबदारी असलेले हृदयाचे स्नायू कालांतराने कमकुवत किंवा ताठर झाल्यामुळे हार्ट फेल्युअरची समस्या निर्माण होते. हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर याचा थेट परिणाम होतो आणि त्यामुळे हृदय प्रसरण पावते. हे खालील आकृतीत दाखवले आहे.

यातील संबंध काय?
हार्ट ऍटॅक ही अचानक होणारी कार्डिऍक घटना आहे. धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा विकार निर्माण होतो. हार्ट फेल्युअरला कारणीभूत ठरणारे घटक अनेक आहेत. यांमध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, कार्डिओमायोपॅथी, इस्केमिक हृदयविकार आदींचा समावेश होतो. पूर्वी हार्ट ऍटॅक येऊन गेला असेल तर तेही हार्ट फेल्युअरला कारणीभूत ठरते. हार्ट ऍटॅक येऊन गेलेल्या चार जणांपैकी एकाला चार वर्षांच्या आत हार्ट फेल्युअरचा त्रास सुरू होऊ शकतो.

ठळक फरक
हार्ट फेल्युअरच्या लक्षणांमध्ये श्‍वास लागणे किंवा हृदयाची गती वाढणे; घोटे, पाय व ओटीपोटावर सूज येणे; उंच उशी घेतल्याशिवाय झोपणे कठीण जाणे; सतत थकल्यासारखे वाटणे आदींचा समावेश होतो. तर पाठ, मान, हात किंवा जबडा दुखणे; मळमळ होणे, थंड घाम फुटणे ही हार्ट ऍटॅकची लक्षणे आहेत.

हार्ट फेल्युअरचे निदान
हार्ट फेल्युअरच्या सुमारे 60 टक्के रुग्णांमध्ये निदानच होत नाही किंवा चुकीचे निदान होते. पंपिंग कार्यक्षमता व प्रसरण पावलेले हृदय यांच्याबद्दल निदान करण्यात ईसीजीची मदत होऊ शकते. एनटी-प्रोबीपी चाचणी प्रामुख्याने हार्ट फेल्युअरची तीव्रता निश्‍चित करण्यासाठी, तिचे निदान करण्यासाठी व मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते.

हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापन
हार्ट ऍटॅक येऊन गेलेले रुग्ण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्‌याचे काटेकोर पालन करून हार्ट फेल्युअर टाळू शकतात. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम, आरोग्यपूर्ण आहार, धूम्रपान टाळणे अशा जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने तसेच मधुमेह व हायपरटेन्शनसारख्या चिवट आजारांचे व्यवस्थापन करून हार्ट फेल्युअर टाळता येते. अलीकडील काळात आलेल्या प्रगत औषधांच्या मदतीने हार्ट फेल्युअरचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये या विकाराचे व्यवस्थापन प्रभावी पद्धतीने करता येते. याला अर्थातच जीवनशैलीतील काही सकारात्मक बदलांची जोड द्यावी लागते. उदाहरणार्थ, आहारातील द्रवपदार्थांचे प्रमाण कमी करणे, मिठाचे सेवन नियंत्रित करणे, आरोग्यपूर्ण आहार घेणे, धूम्रपान सोडणे, मद्यपान मर्यादेत करणे आणि दिनक्रमात सौम्य स्वरूपाच्या शारीरिक व्यायामाचा समावेश करणे.

पॅराडिम-एचएफ या हार्ट फेल्युअरवरील सर्वांत मोठ्या क्‍लिनिकल अभ्यासामध्ये असे लक्षात आले की, एआरएनआयसारख्या प्रगत उपचारांना जीवनशैलीतील बदलांची जोड दिल्यास हार्ट फेल्युअरच्या रुग्णांचा आयुष्याचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारू शकतो. रुग्णांमध्ये पुन्हा-पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागण्यात तसेच मृत्यू होण्याच्या प्रमाणात 20 टक्के घट झाली आहे.
फोकस्ड हार्ट फेल्युअर क्‍लिनिक्‍स, नर्स होम व्हिजिट्‌स आणि संघटित टेलिफोन सहाय्य हे सर्व भारतात हार्ट फेल्युअर्समुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हार्ट फेल्युअर हा एक चिवट स्वरूपाचा आजार आहे.

यामध्ये रक्ताच्या पंपिंगची जबाबदारी असलेले हृदयाचे स्नायू कालांतराने कमकुवत होतात. हार्ट फेल्युअरच्या एकूण रुग्णांपैकी 31 टक्के निदान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत या विकाराने दगावतात. अतिदक्षता विभागात दररोज किमान दोन हार्ट फेल्युअरचे रुग्ण दाखल होतात; यातील बहुतेक रुग्ण विकाराच्या पुढील टप्प्यावर पोहोचलेले असतात. म्हणूनच हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच यावर उपचार सुरू करणे अत्यावश्‍यक आहे. यामुळे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांचे वारंवार रुग्णालयात दाखल होणे कमी होऊ शकेल तसेच त्यांचे आयुष्यही वाढेल.

हार्ट फेल्युअरच्या रुग्णांची क्रमवारी त्यांची अवस्था व लक्षणे किती गंभीर आहेत यावरून निश्‍चित केली जाते. एकूण रुग्णांमध्ये दर महिन्याला 20 टक्के हार्ट फेल्युअरचे रुग्ण असतात. यापैकी 40 टक्के रुग्ण विकाराच्या पुढील टप्प्यावर असतात. पूर्वी येऊन गेलेला हार्ट ऍटक व कोरोनरी आर्टरी डिसीजेस (सीएडी) हे हार्ट फेल्युअरच्या दृष्टीने प्रमुख धोक्‍याचे घटक आहेत. शिवाय हार्ट फेल्युअरच्या रुग्णांपैकी 50 टक्के जणांना मधुमेहाचा त्रास असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.