नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत खेळताना खांद्याला दुखापत झाल्याने केदार जाधवला आयपीएलमधून अर्ध्यातूनच माघार घ्यावी लागली होती. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स ११ पंजाब या संघांदरम्यान ५ मे रोजी झालेल्या सामन्यामध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या केदारला क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला गंबीर स्वरूपाची दुखापत झाल्याचं वृत्त होतं. केदारला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने येत्या ३० मे पासून इंग्लंड येथे सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला केदार मुकतो की काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता केदार जाधव हा पूर्णपणे फिट असल्याची माहिती असून तो आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील खेळणार आहे.
याबाबत, भारतीय संघाच्या एका विश्वसनीय सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली असून या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “केदार जाधवला आयपीएल दरम्यान झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची नसून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेले सर्वच्या सर्व १५ खेळाडू इंग्लंडकडे रवाना होतील.”
दरम्यान, टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या फिटनेस टेस्टनंतर केदारला विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार विश्वचषकामध्ये सामील होणाऱ्या संघांना २३ मे पर्यंत आपल्या अंतिम १५ खेळाडूंच्या यादीमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. केदार जाधव दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी रिषभ पंत याची वर्णी लागेल असे अंदाज बांधण्यात येत होते मात्र आता केदार पूर्णपणे फिट असल्यानं या शक्यतांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.