नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदापेक्षा आधीपासूनच असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदावरच राहणे श्रेयस्कर असल्याचा विचार करत माजी कर्णधार राहुल द्रविडने संचालकपदासाठीच पुन्हा एकदा अर्ज केला. त्याच्या या निर्णयाचे ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान क्रिकेट मंडळांनी तसेच जागतिक क्रिकेटमधील अनेक संघांनी व खेळाडूंनी स्वागत केले आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविडच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना त्याने एका निर्णयाद्वारे सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. एनसीएच्या संचालकपदासाठी द्रविडने दुसऱ्यांदा अर्ज केला आहे. द्रविडचा एनसीएमधील त्याचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बीसीसीआयने क्रिकेट प्रमुखाच्या पदासाठी अर्ज मागवले, तेव्हा द्रविडने पुन्हा या पदासाठी अर्ज केला. पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटपटूंनीही द्रविडच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि डावखुरा सलामीवीर फलंदाज सलमान बट म्हणाला, एनसीएमध्ये क्रिकेट प्रमुखपदासाठी द्रविडने पुन्हा अर्ज करणे हे अधिक चांगले पाऊल ठरणार आहे. एनसीएमध्ये काम करून द्रविड फक्त कनिष्ठ स्तरावरच नव्हे, तर तो भारताचा भविष्यकाळ घडवत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताला असा सेकंड बेंच मिळत आहे, की जो येत्या काळात जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व आबाधित राखेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येणारा खेळाडूंमधील बदल आणि विकासात एनसीएच्या प्रमुखांची मोठी भूमिका आहे. द्रविड कदाचित भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकापेक्षा अधिक महत्त्वाच्या भूमिकेत आहे. माझ्या मते त्याने एनसीएमध्येच क्रिकेटचा प्रमुख म्हणून कायम राहिले पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू ब्रॅड हॉग याने व्यक्त केले आहे.