लंडन – जगभरातील कोविड-19 च्या रुग्णांची एकूण संख्या आता 4 कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरातील कोविड-19 च्या रुग्णसंख्येची काळजीपूर्वक पडताळणी करणाऱ्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी या आकडेवारीने 4 कोटींचा टप्पा पार केला आहे.
मात्र, चाचण्यांची संख्या कमी-अधिक अस्णे, अनेक नागरिकांना लक्षणे न दिसणे आणि काही देशांनी खरी आकडेवारी लपवलेली असल्याने प्रत्यक्षात जगभरातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या यापेक्षाही खूप अधिक असण्याची शक्यता आहे. आजपर्यंत 11 लाखांपेक्षा अधिक लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. पण तज्ज्ञांच्या मते, मृतांची ही आकडेवारीही यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
अमेरिका, ब्राझील आणि भारतामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अलीकडच्या काळात युरोपातही रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. युरोपामध्ये आतापर्यंत 2 लाख 40 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. युरोपातील रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा अधिक आहे. ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि स्पेन या देशांमध्ये जगभरातील रुग्णसंख्येच्या एकतृतीयांश रुग्ण आहेत. याच देशांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येच्या निम्मे रुग्ण सापडले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
रुग्णांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंडसह सर्व युरोपामध्ये मास्कच्या वापराबद्दल नवीन उपाययोजना केल्या जात आहेत. नॉर्दर्न आयर्लंड आणि बेल्जियममध्ये रेस्टॉरंट आणि बार बंद केले गेले आहेत. फ्रान्समध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली गेली आहे. ब्रिटनमध्ये अंशतः लॉकडाऊन करणे अनिवार्य बनले असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.