आईचं दुध अमृतासमानच (भाग ३)

डॉ. वैशाली माने 
1 ते 8 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने बाळाच्या आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे फायदे सांगितले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर तान्हुल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे साक्षात अमृतासमान मानले आहे. आईच्या दुधाला पर्याय नाही. अगदी पर्यायच काढावयाचा झाल्यास आईसमान असणाऱ्या दाईचे दूध हे उत्तम आणि हेही दूध उपलब्ध नसेल तर बकरीचे किंवा देशी गायीचे दूध तेही संस्कारीत करून! 
योग्य पद्धतीने स्तनपान केल्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालमृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. बाळाचा बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने घडून येतो. वारंवार होणाऱ्या सर्दी, फ्लू, कानातील इन्फेक्‍शन, फुप्फुसातील इन्फेक्‍शन, दमा, त्वचाविकार, दातांच्या समस्या बालवयात येऊ शकणारे मधुमेह, रक्ताचा कॅन्सर यासारखे आजार किंवा नंतरच्या आयुष्यात येऊ शकणारी स्थुलता, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, आतड्यांचा जंतुसंसगर्ग कोलायटीस यासारख्या सर्व आजारांची शक्‍यता स्तनपानामुळे बऱ्याच अंशी कमी होते. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबरच आईलादेखील होतात.
गरोदरपणात वजनाबरोबरच गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. डिलिव्हरीनंतर देखील पोट मोठं दिसत असते. रक्तस्राव सुरूच असतो. स्तनपानामुळे डिलिव्हरीनंतरचा रक्तस्राव लवकर आटोक्‍यात येतो. प्रेग्नंसीच्या आधी जेवढा गर्भाशयाचा आकार होता तेवढा परत डिलिव्हरीनंतर स्तनपानामुळे होतो. तसेच प्रेग्नंसीच्या पूर्वी जेवढे आईचे वजन होते तेवढे परत स्तनपानामुळे होण्यास मदत होते. तसेच स्तनाची गर्भाशयाचा किंवा स्त्री-बीज ग्रंथींचा कॅन्सरची शक्‍यता स्तनपानामुळे कमी होते. स्तनपानाच्या कालावधीमध्ये गर्भधारणेची शक्‍यतादेखील नगण्यच असते.
आईला येणारे दूध हे चांगल्या प्रतीचे असेल तरच स्तनपानाचे फायदे बाळास मिळतात. दुधाची परीक्षा कशी करावी? निर्दोष दुधाची लक्षण कोणती हे जाणून घेऊ. 
दूध कमी प्रमाणात येणे 
डिलिव्हरीनंतर आईस दूध येणे ही स्वाभाविक क्रिया आहे; परंतु कधी कधी काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर दूध येत नाही. किंवा आले तरी ते कमी असते. काही स्त्रियांमध्ये सुरुवातीला दूध व्यवस्थित येते; परंतु नंतर नंतर ते कमी होऊन बंद होते.
या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे दूध प्रत्येकवेळी सारख्याच प्रमाणात येत नाही. कधी कमी येते तर कधी जास्त येते. विशेषतः पहाटे किंवा सकाळच्यावेळी पहिल्यांदा दुधाचे प्रमाण जास्त असते. नंतर कमी होत होत रात्री सगळ्यात कमी असते. याचप्रमाणे आईचे खाणे-पिणे, तसेच आईची मनःस्थिती यामुळे देखील दुधाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते आणि अशाप्रकारे दूध कमीजास्त होणे हे स्वाभाविक मानले जाते.
दूध कमी होण्याची कारणे 
स्त्री गरोदर असताना किंवा डिलिव्हरीनंतर तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे किंवा कुपोषण होणे किंवा पुरेसा आहार नसणे.
डिलिव्हरीच्या वेळी किंवा डिलिव्हरीनंतर अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हिमोग्लोबीन कमी होते. त्यामुळे दूध कमी होते.
एकूण मिळूनच प्रकृती खालावल्यामुळे.
डिलिव्हरीनंतर बाळास दूध पाजण्यास उशीर करणे म्हणजे डिलिव्हरीनंतर 2 ते 5 दिवसांनंतर दूध पाजण्यास सुरुवात करणे.
आपणास दूध कमी येत आहे किंवा बाळास दूध पुरेसे मिळत नाही, असे आईला वारंवार वाटणे.
मानसिक ताण-तणाव, प्रतिकूल मनःस्थिती आईने चिडणे, दुःखी राहणे, शोक, चिंता, काळजी करत बसणे किंवा आईला तिच्या बाळाविषयी प्रेम, माया नसणे.
आईने अतिप्रमाणात श्रम करणे किंवा श्रमाची कामे करणे, अतिप्रमाणात व्यायाम करणे किंवा काही आजारांच्या परिणामी आईची तब्येत खालावणे.
दूध कमी झाल्याची लक्षणे – 
दूध कमी झाल्यामुळे आईचे स्तन सुकतात. बाळास फारच थोडे दूध मिळते किंवा मिळतही नाही. त्यामुळे बाळ चिडचिड करते. सारखेच रडते. बाळ बारीक होते. बाळाचे वजन वाढत तर नाहीच, पण आहे त्यापेक्षाही वजन कमी होते. बाळ निस्तेज दिसू लागते. बाळास झोप लागत नाही. बाळास कुपोषणजन्य आजार होण्याची शक्‍यता निर्माण होते.
दूध वात-पित्त-कफ या दोषांनी दूषित होणे स्तन्यदुष्टीची कारणे 
खाल्लेल्या अन्नाचे योग्य रितीने पचन न होणे, वारंवार अजीर्ण होणे, सवयीचे नसलेले पदार्थ खाणे, विरुद्ध अन्न खाणे, जेवण अतिप्रमाणात करणे, खारट, आंबट, तिखट, शिळे, नासलेले अन्न खाल्ल्यामुळे, आदमुरे दही, खिचडी खाल्ल्यामुळे तसेच शरीर व मन यांचा संताप झाल्याने, जागरण झाल्याने, चिंतेमुळे, ढेकर, शिंक, उलटी, लघवी, संडास, खालून निघणारा गॅस, तहान, भूक, झोप, जांभई यांचे नैसर्गिक वेग आवरून धरण्याने किंवा हे वेग आलेले नसताना बळेच काढल्याने, चिडल्याने, मार लागल्याने किंवा पचण्यास जड अन्न खाऊन दिवसा झोपल्याने, मुळीच हालचाल न केल्याने वात-पित्त-कफ वाढून दुधामध्ये दोष येतात.
वातदोषामुळे दूध दूषित झाल्यास… 
वातामुळे दूध दूषित झाल्यास ते दूध पाण्यात टाकले असता पसरते आणि फुटीर होऊन तरंगते. हे दूध पातळ, फेसकट, रुक्ष, ओशटपणा नसलेले, चव नसलेले, स्पष्ट गंध नसलेले असे असते. असे दूध पिल्याने बाळाचे तोंड बेचव होते. बाळाची दूध पिऊनही तृप्ती होत नाही. बाळ बारीक होत राहते. म्हणजे वजन कमी होते. बाळाची वाढ फारच कष्टाने होते. या दुधामुळे पोटात गॅस होतो, पोट फुगते, शी-शू अडखळत होते किंवा साफ होत नाही किंवा होतही नाही. बाळाचा आवाज बारीक होतो किंवा आवाज ओढळ्यासारखा वाटतो.
महत्वाचे 
प्रत्येक वेळेला बाळ रडायला लागले की त्याला भूक लागली असते. असं नाही. बरेचदा त्याचे काही दुखत असते, खेळायचे असते इ. त्यांच्याकडे रडल्याशिवाय दुसरे काही माध्यम नसते. व्यक्त करायला त्याच्या तोंडाशी बोट द्यावे, त्याने जर आ केला तर त्याला भूक लागली समजावे. बाळाला दूध पुरेसे आहे की नाही हे पडताळणे सोपे आहे.
स्तनपान झाल्यावर ते सलग 2-3 तास शांत झोपते का?
24 तासांत 6-8 वेळा लघवी करते
4-6 वेळा शी करत आहे का?
त्याव्यतिरिक्त दिवस बाळाचे वजन महिन्याकाठी 1/2 किलो वाढते का?
6 महिन्यात बाळाचे वजन पहिल्यापेक्षा दुप्पट पाहिजे व वर्षाकाठी तिप्पट पाहिजे.
पहिले 6 महिने आईला काही त्रास नसल्यास व दूध उतरत असल्यास निव्वळ स्तनपान द्यावे. बाळाच्या वाढीसाठी तेच योग्य असते.
6 महिन्यांनंतर बाळाच्या पोषकतत्त्वांच्या गरजा वाढतात. त्यामुळे पूरक आहार सुरू करावा, पण स्तनपान बाळ 1/2-2 वर्षांचे होईपर्यंत चालू ठेवावे.
यशस्वी स्तनपान हे आईच्या आहारावरदेखील निर्भर असते. स्तनदा मातेचा आहार संतुलित असावा व त्यात सर्व पोषक तत्त्वे भरपूर असावीत. विशेषतः प्रथिने, कॅल्शियम व उर्जा(अतिउर्जा) युक्त स्त्रोत तिच्या आहारात असावे. दूधस्त्राव वाढण्यासाठी आहारात सरश्ररलीेंसेर्सीशी (गॅलॅगटोगॉग्स) जसे बाजरी, सुकामेवा, अळीव, जवस, सब्जाचे बी, तीळ, खसखस, मेथी (दाणे व भाजी), डिंक, लसूण, सुके मासे, दूध, लोणी, तूप इ.चा सामावेश असावा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)