वॉशिंग्टन – जागतिक बॅंकेने करोना लसीची खरेदी, वितरण, चाचणी आणि उपचारासाठी विकसनशील देशांना 12 अब्ज डॉलर रक्कम मंजूर केली आहे. यातून किमान 100 कोटी लोकांना लसीचा डोस घेण्यास मदत होईल असा बॅंकेला विश्वास वाटतो आहे.
बॅंकेने मंगळवारी रात्री यासंदर्भातले निवेदन जारी केले आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी विकसनशील देशांकरता जागतिक बॅंकेने एकूण 160 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. हे 12 अब्ज डॉलर त्याच पॅकेजचा हिस्सा असल्याचे सांगण्यात आले.
केवळ श्रीमंत राष्ट्रेच नव्हे, तर विकसनशील राष्ट्रांच्या नागरिकांपर्यंतही कोविडची लस पोहोचणे आणि त्यांना वेळीच योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यापर्यंत मदत सामग्री योग्य रित्या पोहोचावी याकरता आम्ही आमचा दृष्टीकोन अधिक विकसित करत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.