कोलंबो – श्रीलंकेला जागतिक बॅंकेकडून 160 दशलक्ष डॉलरची मदत मिळाली आहे. त्यापैकी काही निधी श्रीलंका सरकारकडून इंधन खरेदीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आज संसदेत ही माहिती दिली. जागतिक बॅंकेच्या या मदतीशिवाय आशियाई बॅंकेचे अनुदानही लवकरच मिळणार आहेत.
मात्र, हा सर्व निधी इंधन खरेदीसाठी वापरला जाऊ शकणार नाही. त्यापैकी काही निधी इंधन खरेदीसाठी वापरला जाईल, असेही विक्रमसिंघे यांनी सांगितले.
भारताकडून पत हमीच्या आधारे दोन मालवाहू जहाजांमधून पेट्रोल या आठवड्यात, 29 मे पर्यंत मिळणे अपेक्षित आहे, असेही विक्रमसिंघे यांनी सांगितले. श्रीलंकेत निर्माण झालेल्या अभूतपूर्व इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी उग्र आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक रोखून निषेध करायला सुरुवात केली आहे.
देशात सध्या पेट्रोलचा साठा नाही. सध्या अत्यंत आवश्यक सेवेपुरते पेट्रोल उपलब्ध आहे. आयात केलेले पेट्रोल ताब्यात घेण्यापुरते डॉलर आता मिळाले आहेत. या आठवड्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध करून दिले जाईल. पण तोपर्यंत पेट्रोलपंपांवर रांगा लावून बसू नका, असे ऊर्जामंत्री कांचना विजेसेखर यांनी म्हटले आहे.