नवी दिल्ली: जागतिक बॅंकेने भारताला पुन्हा मदतीचा हात दिला आहे. त्याअंतर्गत करोनाविरोधी लढ्यासाठी भारताला आणखी 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेने मागील महिन्यात भारताच्या आरोग्य क्षेत्रासाठी 1 अब्ज डॉलर्स निधीची घोषणा केली.
त्यानंतर शुक्रवारी नव्याने भारताला कर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे जागतिक बॅंकेकडून भारताला एकूण 2 अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरिबांना सामाजिक सहाय्यता उपलब्ध करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना हातभार लागेल. भारताच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना मदत पुरवण्याच्या उद्देशातूनही जागतिक बॅंक केंद्र सरकारशी चर्चा करत आहे.
करोना फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांमधील सरकारांना लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगशी संबंधित निर्बंध लागू करणे भाग पडले आहे. भारतातील लॉकडाऊनकडे जगातील सर्वांत मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. त्या निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे करोनाविरोधी लढ्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी अनेक देशांना प्रचंड निधीची गरज भासत आहे.