जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: प्रणय, समीर वर्मा यांची विजयी सलामी

नानजिंग:  भारताचा गुणवान खेळाडू एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये मात करताना येथे सुरू झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. तसेच मिश्र दुहेरीत तीन भारतीय जोड्यांनी आणि पुरुष दुहेरीत एका भारतीय जोडीने पहिल्या फेरीची वेस ओलांडताना विजयी सलामी दिली. परंतु महिला दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि प्राजक्‍ता सावंत या भारतीय जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

विजेतेपदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार असलेला भारताचा अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांतबरोबरच एच. एस. प्रणयलाही सनसनाटी विजयासाठी पसंती देण्यात आली आहे. पहिल्या फेरीत न्यूझीलंडच्या अभिनव मानोटाचे आव्हान 21-12, 21-11 असे केवळ 28 मिनिटांत संपुष्टात आणताना प्रणयने जागतिक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. अकराव्या मानांकित प्रणयसमोर दुसऱ्या फेरीत ब्राझिलच्या वायगोर कोएल्होचे आव्हान आहे. पहिल्या फेरीत वायगोर 22-20, 19-21, 11-4 असा आघाडीवर असताना हॉंगकॉंगच्या वोंग विंग व्हिन्सेंटने सामना सोडून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या बिगरमानांकित समीर वर्माने फ्रान्सच्या लुकास कोर्व्हीचा प्रतिकार 21-13, 21-10 असा 39 मिनिटांत संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. समीरला दुसऱ्या फेरीत मात्र चीनच्या माजी जगज्जेत्या लिन डॅनशी झुंज द्यावी लागणार आहे. लिनने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या मार्क कॅलजोचा 21-14, 21-14 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताची जागतिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत बाय असून सायना नेहवालची सलामीची लढत तुर्कीच्या ऍलिये डेमिरबॅगशी होणार आहे.

मिश्र दुहेरीत भारतीयांची आगेकूच

तीन भारतीय जोड्यांनी मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली असून पुरुष दुहेरीत एका जोडीने विजय मिळविला आहे. सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीने इंग्लंडच्या बेन लेन व जेसिका पुघ या जोडीचा 21-10, 21-18 असा 33 मिनिटांत पराभव करीत विजयी सलामी दिली. तर प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या जोडीने जेकब बिटमन व आल्झबेटा बेसोव्हा या झेक प्रजासत्ताकाच्या जोडीचा 21-17, 21-15 असा 30 मिनिटांत पराभव करीत दुसरी फेरी गाठली.

सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीनेही एनेजो ऍबाह व पीस ओरजी या नायजेरियाच्या जोडीचा 21-13, 21-12 असा 26 मिनिटांत फडशा पाडताना मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या लागोस स्पर्धेतील विजेत्या भारतीय जोडीने डॅनिएल निकोलोव्ह व इव्हान रुझेव्ह या बल्गेरियन जोडीचा 21-13, 21-19 असा पराभव करताना दुसरी फेरी गाटली. मात्र संयोगिता घोरपडे व प्राजक्‍ता सावंत या जोडीला बेंगिसू एर्सेटिन व नाझलिकॅन इर्की या तुर्कीच्या जोडीविरुद्ध 20-22, 14-21 असा पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)