जागतिक कृषी पर्यटन दिन : शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन जोडधंदा नव्हे ‘ग्रीन बिझनेस व्हावा’

– तुषार रंधवे

पुणे – जागतिक पातळीवर 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून याला मान्यता देण्यात आली आहे. आपल्या देशात शेतीला पूरक जोडधंदे वाढीस लागावेत, याकरिता केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये कृषी पर्यटनाचाही समावेश आहे. परंतु, अन्य देशांत याकडे जोडधंदा न पाहता बिझनेस म्हणून पाहिले जाते.

आपल्याकडेही सरकार तसेच शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाकडे ग्रीन बिझनेस म्हणून पहायला हवे.
शेताच्या एक दिवसाच्या सफरीसाठी शहरातला माणूस शेतकऱ्याला दरडोई 500 ते 1000 रुपये सहज देऊ शकतो. जे एका शेतकऱ्यासाठी खूप असतात. अमेरिकेत हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा 6 टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. आपल्या देशातही असे होऊ शकते आणि शेतकऱ्यांना मुख्य बिझनेस उपलब्ध होऊ शकतो. परंतु, याकडे शासनस्तरावर लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीशी निगडित आहेत.

परंतु, हळूहळू शेती करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. देशातील जवळपास 50 टक्के लोक शेतीपासून आणि पर्यायाने निसर्गापासून दूर चालले आहेत. परिस्थितीनुसार आणि बदलत्या जीवनशैलीनुसार हे लोक शेतीपासून दूर जात असले तरी त्यांच्या मनातले निसर्गाविषयीचे आकर्षण कमी झालेले नाही. कधीतरी शेतात जावे, हिरव्या पिकातून फिरावे, कालव्यातल्या पाण्यातून नाचावे, विहिरीत डुंबावे, बैलगाडीतून सफर करावी आणि हिरव्यागार आंब्याच्या झाडाखाली निसर्गातला थंडावा अनुभवत शांतपणे झोपावे, असे प्रत्येकालाच मनातून वाटते.

चुलीवर भाजलेली गरम भाकरी आणि चवदार वांग्याची भाजी यातून शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा व्यवसाय होतो. शहरातल्या लोकांना शेतातली मजा उपभोगता यावी यासाठी काही विशेष सोयी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात निर्माण केल्या तर त्याला त्यातून चांगले उत्पन्नही मिळू शकेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.