श्रीनगर – जम्मू-काश्मीर प्रशासनातील काही कर्मचारी खरी सेवा सोडून दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तशाप्रकारचे नापाक उद्योग करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ती कारवाई झालेल्यांमध्ये हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचाही समावेश आहे.
बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा, आरोग्य विभागांबरोबरच वैद्यकशास्त्र संस्थेत काम करत होते. राज्यघटनेच्या कलम 311 अंतर्गत ती कारवाई करण्यात आली. त्या कलमामुळे कुठल्या चौकशीची गरज भासत नाही.
तसेच, बडतर्फ कर्मचाऱ्यांपुढे दिलासा मिळवण्यासाठी केवळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय उरतो. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असणाऱ्या सलाहुद्दीन याच्या दोन मुलांनाही बडतर्फ करण्यात आल्याने त्या कारवाईचे महत्व वाढले आहे.
सैद अहमद शकिल आणि शाहीद युसूफ अशी सलाहुद्दीनच्या मुलांची नावे आहेत. त्यातील एक जण वैद्यकशास्त्र संस्थेत, तर दुसरा शिक्षण विभागात रूजू होता. सलाहुद्दीनची मुले दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्यात गुंतली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ती बाब उघडकीस आणली.
प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले इतर लष्कर-ए-तोयबा आणि इतर काही दहशतवादी संघटनांसाठी काम करत होते. दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती देणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रास्त्रांची तस्करी करणे यांसारख्या कारवायांमध्ये ते सामील असल्याचे स्पष्ट झाले. दोन पोलिसांचीही सेवेतून हकालपट्टी झाली. त्यातील एक जण तर सुरक्षा जवानांवरील हल्ल्यांच्या कटात सामील असल्याचे आढळले.