शिरूरमध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

शेरखान शेख
शिक्रापूर – पुणे जिल्ह्यामध्ये राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. “काटे की टक्‍कर’ अशी लढाई झाली. निवडणुका होऊन आता मतमोजणीचा दिवस आल्यामुळे कोण आमदार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मतदारसंघात दोघांबाबत तर्क- वितर्क लढविले जात आहेत.

शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अशोक पवार विरुद्ध भाजपचे बाबुराव पाचर्णे अशी सरळ लढत झाली आहे. या दोघांनी यापूर्वी एकमेकांविरोधात निवडणुका लढविल्या आहेत. दोघांनी विजय व पराजयाचा सामना केला आहे. ऐन निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये पक्षांतर केले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. भाजपची ताकद वाढली गेली, असे बोलले गेले. परंतु दोन्ही पक्षांनी आपापल्या मुद्‌द्‌यांवर निवडणुका लढविल्या. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेत नवा चेहरा आखाड्यात उतरविला. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपाच्या मतांमध्ये थोडाफार फरक दिसून येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास नरके हे कोणाची किती मते घेतात. त्यामुळे कोणाच्या मतात फरक पडणार, हा चर्चेचा विषय झाला आहे. एकीकडे भाजपाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांची सभा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिरूर येथे रॅली काढली होती. अशोक पवार यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व माजी मुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास नरके यांनी प्रचारावर जोर देत विरोधकांना आव्हान उभे केले होते. आता निवडणुकीच्या निकालाचा दिवस उजाडला आहे. शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार आणि कोण किती मते घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
पक्षाचे फ्लेक्‍स तयार
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी व भाजपाचे कार्यकर्ते आमचाच उमेदवार विजयी होणार, असे छातीठोकपणे सांगत आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा उमेदवार विजयी झाल्याबाबत फ्लेक्‍स तयार केलेले आहेत. निकाल जाहीर होताच लगेच मतदारसंघात फ्लेक्‍स लावण्याचे नियोजन केल्याचे शिक्रापूर येथील एका फ्लेक्‍स व्यावसायिकाने सांगितले आहे.
प्रदीप कंद यांचा फायदा की तोटा?
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातून अनेक दिवसांपासून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आणि मतदारसंघ पिंजून काढणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु कंद यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्येच राहिले. त्यामुळे प्रदीप कंद यांचा फायदा भाजपाला होणार की राष्ट्रवादीला फटका बसणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.