शिंदे वासुली -संचारबंदीमुळे लॉकडाऊन झालेल्या चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी व वराळे परिसरात राहणाऱ्या भाडेकरू व कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी, कार्यकर्ते यांचा “मदतीचा हात’ हा व्हॉट्स ऍप ग्रुप केला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील सगळ्याच कंपन्यांचे शटर डाऊन आहे. शासनाने कंत्राटी तसेच कायमस्वरुपी कामगारांना कंपनी व ठेकेदाराने पगारात कपात न करता महिन्याचा पूर्ण पगार देण्याचे आवाहन व आदेश दिले आहेत. कामगार ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहतात त्याठिकाणी राहण्यास सांगितले आहे; परंतु लॉकडाऊन खुले होऊन कंपन्या कधी चालू होतील याची शाश्वती नाही. चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील कामगारांची परिस्थिती बिकट होत चालली आहे.
कंपन्यांनी पगार दिले आहे; पण ठेकेदार देत नाहीत. काही ठेकेदार कामगारांचे फोन घेत नाहीत. शासनाकडून अद्यापि जेवणाची व कोणतीही ठोस मदत कामगारांसाठी करण्यात आली नाही. अशा कामगारांना करोना आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत, किराणा व जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी बुट्टे पाटलांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही चालू केली आहे.
बुट्टे पाटलांनी टप्पा दोन मधील सगळ्या ग्रामपंचायत हद्दीतील एकूण भाडेकरू / कामगार यांचा सर्व्हे करून कामगाराचे नाव, मोबाईल नंबर, काम करीत असलेल्या कंपनीचे नाव, ठेकेदाराचे नाव मोबाईल नंबर अशी माहिती संकलित करून कामगारांना आर्थिक मदत व किराणा माल मिळवून देण्यासाठी संबंधित कंपन्या व ठेकेदारांना संपर्क केला जात आहे. योग्य नियोजन केल्याने या माध्यमातून अनेक कामगारांना पगार, ऍडव्हान्स, किराणा व जीवनावश्यक वस्तूंची मदत करुन कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाते आहे. याकामी पोलीस पाटील अहोरात्र काम करीत आहेत.
आमची एवढीच विनंती…
महिन्याचा पगार कपात न करता तात्काळ मिळावा, रुमभाडे व महिन्याचे रेशन अथवा जेवणाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी करुन अन्यथा आम्हाला आमच्या घरी सकुशल जाण्याची परवानगी किंवा व्यवस्था करावी, अशी विनंती एमआयडीसी कामगारांनी विशेषतः कंत्राटी कामगारांनी पोटतिडकीने केली आहे.