वर्धा – देशात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित सुरू आहे. या काळात राज्यातील काही कंपन्यांनी मजुरांची हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी अग्रवाल जिनिंग आणि प्रेसिंग कंपनीवर कारवाई करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच गुन्हाही दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सेलू येथे दिलेल्या भेटीदरम्यान आर्वी येथील विपीन अग्रवाल जिनिंग-प्रेसिंग कंपनीतील काही मजूर परत गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. यादरम्यान त्यांना सेलू येथे रोखण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गृह निवाऱ्यात मजुरांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. सदर मजुरांची आर्वी येथील जिनिंग प्रेसिंग कंपनीमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच कारवाई करीत जिनिंग मालकाला 2 लाख रुपयाचा दंड ठोठावण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. सेलू, सिंदी, वर्धा या भागात केलेल्या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांना कंपन्यांकडून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1857 ची पायमल्ली होत असलयाचे दिसून आले आहे. या प्रकरणाची वेळीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान, वर्ध्यातील कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्वच कंपनी मालकांचे धागे दणाणले आहेत. मोठ्या प्रमाणात मजूर रस्त्यावर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.