मजुरांची प्रचारामुळे चंगळ, शेतकरी विवंचनेत

सोनई – राज्यात सगळीकडेच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पुढारी, अतिउत्साही कार्यकर्ते, मजूर प्रचारात मग्न आहेत. सगळीकडे हॉटेल, ढाब्यांवर भरपूर नर्दी आहे. सध्या अनेक पिके कापणीस आली आहेत. मात्र शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी मात्र विवंचनेत आहे.

सोनई परिसरात पुरेसा पाऊस नसला, तरी भीज पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. पाटाला देखील जवळपास दोन महिने पाणी होते. त्यामुळे या परिसरात बाजरी, सोयाबीन, कपाशीचे पीक चांगले आहे. भीज पावसामुळे या पिकांमध्ये तण वाढले असून, यंदा कांद्याचे भाव गगनाला भिडले असून, बरेच शेतकरी कांद्याची लागवड करीत आहेत. बाजरी देखील सोंगणीला आली. काही शेतकऱ्यांनी बाजरी सोंगून ठेवली.

पाऊस कधीही येऊ शकतो, म्हणून मजूर लावून ती तयार करायची, रान तयार करुन कांद्याची रोप आणून लागवड करायची, अशी गडबड शेतकऱ्यांची सुरू आहे त्यात निवडणूक असल्याने उमेदवारांची आवक जावक आहे. मात्र शेतमजुरांना प्रचारातून रोजगार मिळत असल्याने त्यांनी शेती कामाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रचारफेरीसाठी मजुरांना रोजंदारी जास्त मिळते. शिवाय ज्या गावात फेरीला जायचे, तेथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था असते. जेवणाची देखील व्यवस्था केलीली असते आणि फार कष्टही नाहीत.

फक्त फिरायचे आणि मजुरी रोखीख घ्यायची.शेतीत मात्र काम करावे लागते व मजुरी देखील कमीच आहे. मग निवडणुकीचे जवळपास पंधरा दिवस शेतीत उन्हात घाम गाळण्यापेक्षा प्रचारासाठी जाणेच पसंत करतात. त्यामुळे सोनई परिसरात शेतमजूरच मिळेनात. ज्यांची शेती कमी आहे, ते शेतीची कामे कुटुंबातील सदस्यांना घेऊन करत आहेत. मात्र ज्यांची शेती मोठी आहे, त्यांच्यापुढे मात्र मजुरांची समस्या उभी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.